कारगिल युद्धादरम्यान वायपेयींची नवाज शरीफांसोबत चार-पाच वेळा चर्चा; पुस्तकातून गौप्यस्फोट

पुस्तकातून अनेक विषयांवर भाष्य

कारगिल युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अंधारात ठेवलं होतं, असं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांचं म्हणणं होतं. भारत पाकिस्तानदरम्यान १९९९ मध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी कारगिल युद्धादरम्यान वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांच्याशी चार ते पाच वेळा चर्चा केली होती. अटल बिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा यांचं नवं पुस्तक ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ यामध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

सिन्हा यांनी तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत अनेक वर्षे पीएमओसह खासगी सचिव म्हणून काम केलं आहे. त्यांचं हे पुस्तक २५ डिसेंबर रोजी प्रकाशित केलं जाणार आहे. सिन्हा सध्या एमएस विद्यापीठ, बडोदे येथे अटलबिहारी वाजपेयी पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनल स्टडीजचे मानद संचालक आहेत. वाजपेयी यांची आज अनेकांकडून आवर्जून आठवण काढली जाते. परंतु १९९८ मध्ये त्यांना सरकार तयार करण्यासाठी किती मेहनत करावी लागली होती याची माहिती अनेकांना नाही. याव्यतिरिक्तही त्यांनी अणूचाचणी आणि पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करण्यासारखे मोठे निर्णय घेतले. या मुद्द्यांवर त्यांनी भारताचा ठामपणे बचाव केला. परंतु त्याच वेळी कारगिल युद्धाची सुरूवात झाली. त्यावेळी त्यांना आपल्याच सरकारमधून मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला होता, असं सिन्हा यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

पाकिस्तानी लष्कराचे तत्कालिन प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जाणूनबुजून देशातील सरकारलाही कारगिल युद्धात सामील केलं असं वाजेपेयी यांना वाटत असल्याचं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. यामुळेच कारगिल युद्धादरम्यान त्यांनी नवाज शरीफ यांच्याशी फोनवरून चार ते पाच वेळा चर्चा केली. दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी त्यावेळी वाजपेयी यांनी आर.के. मिश्रा यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. परंतु पाकिस्तानी पंतप्रधान आणि मिश्रा यांच्यादरम्यान घडलेल्या एका घटनेनंतर वाजपेयी यांनी स्वत: शरीफ यांच्याशी चर्चा केली होती, असंही पुस्तकात म्हटलं आहे.

कारगिल युद्धादरम्यान नवाज शरीफ हे स्वत: तणावात होते. एकदा त्यांनी आर.के. मिश्रा यांना कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी गार्डनमध्ये वॉकला गेलं पाहिजे असं सांगितलं होतं. यावरून त्यांच्यावर कोणीतरी पाळत ठेवत असल्याची शंका त्यांना होती. मिश्रा यांनी ही माहिती वाजपेयी यांना दिली. यावरून शरीफ हे सद्यस्थितीत एका कैद्याप्रमाणे असल्याचं वाजपेयी यांना समजलं होतं. त्यानंतर १५ दिवसांमध्ये वाजपेयी यांनी शरीफ यांच्याशी चार ते पाच वेळा चर्चा केली असल्याचा दावा ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’तून करण्यात आला आहे.

एलओसीवर पाकिस्तानी लष्कर माघारी जाण्याचं कारण दोन टेलिफोन रेकॉर्डिंग होते. जे रॉ चे तत्कालिन प्रमुख अरविंद दवे यांनी वाजपेयी यांना सोपवले होते, असा दावाही पुस्तकाद्वारे करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल मोहम्मद अझीझ यांच्यात झालेली चर्चा होती. या रकॉर्डिंगवरून या संपूर्ण घटनेत पाकिस्तानी लष्कर सहभागी होतं आणि मुजाहिद्दीनची भूमिका कमी होती हे दिसून येत होतं. हे रकॉर्डिंग नवाज शरीफ यांच्यापर्यंतही पोहोचवण्यात आले होते, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Atal bihari vajpayee sharif spoke over phone in the midst of kargil war says book jud

ताज्या बातम्या