पीटीआय, नवी दिल्ली
जागतिक पातळीवर तापलेल्या खनिज तेलाच्या किमतींमुळे विमानाचे इंधन म्हणून प्रचलित असलेल्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) किमती दुपटीहून अधिक वाढणे अपेक्षित असतानाही, बुधवारी देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ही दरवाढ केवळ ८.५ टक्क्यांच्या मर्यादेत केली गेली.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएफच्या दरात प्रति किलोलीटर ८,२८९.०४ रुपयांची (किंवा ८.५६ टक्के) वाढ करण्यात आली. यामुळे गेल्या महिन्यातील ९६,६३८.१४ रुपये प्रति किलोलीटर असलेला दर आता १,०४,९२७.१८ रुपये प्रति किलोलीटर झाला आहे. मुंबईत एटीएफचा प्रति किलोलीटर दर ९८,२४७ रुपयांवर पोहोचला आहे.
परदेशी विमान कंपन्या तसेच ‘अनियमित’ (नॉन-शेड्युल्ड), तात्पुरत्या (ॲड-हॉक) आणि खासगी (चार्टर) हवाई सेवा पुरवणाऱ्या इतर विमान कंपन्यांसाठी मात्र, एटीएफच्या दरात प्रति किलोलीटर १,१०,७०३.०८ रुपयांची (किंवा ११४.५ टक्के) प्रचंड वाढ करण्यात आली असून, त्यांचा दर आता २,०७,३४१.२२ रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचला आहे. या कंपन्यांच्या तुलनेत देशांतर्गत विमान कंपन्यांना निम्मीच किंमत मोजावी लागेल.
एटीएफची किंमत २ लाख रुपये प्रति किलोलिटरचा टप्पा ओलांडण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वीचा उच्चांक २०२२ मध्ये नोंदवला गेला होता; जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे दर १.१ लाख रुपये प्रति किलोलिटरपर्यंत पोहोचले होते. दरांमध्ये झालेली ही सलग दुसऱ्या महिन्यातील वाढ आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढणार आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे काही भागांतील हवाई हद्द बंद असल्याने, पाश्चात्य देशांकडे जाण्यासाठी विमान कंपन्यांना आता अधिक लांबीच्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे; ज्यामुळे त्यांना आधीच अधिक इंधन खर्च करावे लागत आहे. विमान कंपनीच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे ४० टक्के खर्च हा केवळ इंधनावरच होत असतो.
भारतातील एटीएफच्या किमतींवरील सरकारी नियंत्रण २००१ मध्ये काढण्यात आले. तेव्हापासून, आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे निश्चित केलेल्या एका सूत्राचा वापर करून, या किमतींमध्ये दरमहा सुधारणा केली जाते. होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी आणि जागतिक ऊर्जा बाजारपेठेत निर्माण झालेली असाधारण परिस्थिती यामुळे, १ एप्रिल रोजी देशांतर्गत बाजारपेठेतील एटीएफच्या किमतींमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती, असे जेट इंधनाच्या किमती वाढवण्यामागील कारण स्पष्ट करताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले.
देशांतर्गत विमान कंपन्यांना संरक्षण
विमान इंधनाच्या किमतीत बुधवारी दुप्पटीहून अधिक वाढ होऊन ती विक्रमी २.०७ लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचली. मात्र, देशांतर्गत विमान कंपन्यांना ही प्रचंड दरवाढ सोसावी लागणार नाही; कारण त्यांना यापासून संरक्षण देण्यासाठी एक विशेष यंत्रणा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
