उत्तर प्रदेशातील झाशीजवळ झालेल्या भीषण अपघातात कुख्यात गँगस्टर-राजकारणी अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमद याचा मृत्यू झाल्यानंतर तपासाला वेग आला आहे. अपघातग्रस्त कारची फॉरेन्सिक तपासणी करताना पोलिसांना वाहनातून अनेक वैयक्तिक वस्तू मिळाल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. विशेषतः कारमधून सापडलेले चार मोबाईल फोन तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबद्दल सविस्तर वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.
कारमधून नेमके काय जप्त झाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ह्युंदाई क्रेटा कारमधून सिग्नेचर गुटख्याचे पाकीट, क्लासिक सिगारेटचे पाकीट, चार मोबाईल फोन, इंग्रजीतील दोन पुस्तके त्यापैकी एक द स्टेशनरी शॉप ऑफ तेहरान ही कादंबरी, एक जोडी बूट, चार जोड चप्पल तसेच इतर वैयक्तिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू पुरावा म्हणून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
चार मोबाईल फोन तपासाचा केंद्रबिंदू
कारमधून मिळालेल्या चार मोबाईल फोनची तपासणी केली जाणार आहे. अपघातापूर्वी कोणाशी संपर्क झाला होता, कोणते कॉल किंवा संदेश झाले होते, तसेच वाहनातील प्रवाशांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी या फोनमधील माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
झाशी कारागृहाकडे जात असताना अपघात
२१ वर्षीय अबान अहमद आपल्या चार मित्रांसह झाशी कारागृहात मोठा भाऊ अली अहमदची भेट घेण्यासाठी निघाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, भरधाव वेगाने धावणाऱ्या एसयूव्हीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले. या अपघातात अबान अहमद आणि त्याचा मित्र मोहम्मद शाकीर उर्फ सोनू यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.
अपघातामागील कारणांचा शोध
या अपघातामागे नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. झाशीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक बी.बी. जीटीएस मूर्ती यांनी सांगितले की, वाहन चालवत असताना चालक झैद याला काही क्षणांसाठी चक्कर किंवा ब्लॅकआउट आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता आहे.
कोण होता अबान अहमद?
अबान अहमद हा अतीक अहमदच्या पाच मुलांपैकी धाकटा होता. त्याचे मोठे भाऊ उमर आणि अली सध्या तुरुंगात आहेत, तर तिसरा भाऊ असद अहमद २०२३ मध्ये पोलिस चकमकीत ठार झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये पोलिस बंदोबस्तात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे सतत लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या कुटुंबावर अबानच्या मृत्यूमुळे शोकांतिका ओढावली आहे.
