Atiq Ahmed Son Aban Ahmed Accident Death: गँगस्टर अतीक अहमद याच्या सर्वात लहान मुलाचा झाशी येथे अपघातात मृत्यू झाला आहे. पाच मुलांपैकी सर्वात लहान असलेला अबान अहमद याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तुरुंगात असलेल्या भावा भेटण्यासाठी जात असाताना दुभाजकाला धडकून अबानचा मृत्यू झाला, अशी माहिती झाशी पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. गँगस्टर अतीक अहमद याची एप्रिल २०२३ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

भीषण अपघातात अबान अहमद ठार

एएनआयच्या वृत्तानुसार, अबान अहमद त्याच्या चार मित्रांसोबत कारमधून निघाला होता. तुरुंगात असलेल्या भावाला भेटण्यासाठी अबान निघाला होता. दरम्यान, कार झाशी येथे महामार्गावर दुभाजकाला धडकली यातच अबान याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून, कारचे तुटलेले भाग रस्त्यावर विखुरल्याचे दिसून आले. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, या अपघातात अबान अहमद याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भावाला भेटण्यासाठी जाताना अपघात

अबान अहमद हा अतीक अहमदचा सर्वात लहान मुलगा मुलगा होता. अबान त्याच्या इतर मित्रांसोबत तुरुंगात असलेला भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी निघाला होता. अली अहमद झाशीच्या जिल्हा कारागृहात बंद आहे. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याला नैनी मध्यवर्ती कारागृहातून झाशीला हलविण्यात आले होते. अलीला भेटण्यासाठी अबान प्रयागराज येथून झाशीला जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला. यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

अली अहमद तुरुंगात

अली अहमदला खंडणीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर तो तुरुंगात आहे. २०२३ मधील उमेश पाल यांच्या हत्याप्रकरणात देखील तो एक संशयित आहे. बीएसपी आमदार राजू पाल यांच्या हत्याप्रकरणात उमेश पाल मुख्य साक्षीदार होते. या हत्याप्रकरणाची सूत्रे तुरुंगातूनच हलविण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. अतीक अहमदच्या हत्येनंतर अलीने गृन्हेगारी नेटवर्क असलेल्या आयएस-२२७ ची सूत्रे हाती घेतली आहेत.

अतीक अहमदची हत्या

५ एप्रिल २०२३ रोजी, उमेश पाल हत्याकांडासह १०० हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव असलेले अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ, यांना प्रयागराजमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पोलीस कर्मचारी घेऊन जात असताना, पत्रकार असल्याचे भासवणाऱ्या तीन व्यक्तींनी माध्यमांशी संवाद साधत असताना अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले.