Atishi : दिल्लीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालल यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेत आतिशी ( Atishi ) यांचं नावही समोर येतं आहे. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

“काही लोक म्हणत आहेत की सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे मी काहीच काम करु शकणार नाही. मागच्या काही वर्षभरात केंद्र सरकारने काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने एक कायदा, दोन कायदे असे फक्त कायदे आणून आमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला”, मात्र पुढील दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मी (अरविंद केजरीवाल) आणि मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर जनतेला आम्ही प्रामाणिक वाटत असलो तर आम्हाला ते निवडून देतील”, असं केजरीवाल यांनी म्हटलं. अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याच्या चर्चा सुरु आहेत. आप नेत्या आतिशी ( Atishi ) यांना विचारलं असता त्यांनी यावर उत्तर दिलं.

अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

हे पण वाचा- Arvind Kejriwal : केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

आपच्या नेत्या आतिशी काय म्हणाल्या?

तुम्ही दिल्लीच्या पुढच्या मुख्यमंत्री असाल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर आतिशी म्हणाल्या, “तुम्ही अशा एका पक्षाच्या नेत्याशी बोलत आहात, ज्याने प्रामाणिकपणा काय असतो याचा नवा आदर्श घालून दिला आहे. अरविंद केजरीवाल सोडून मला अशा नेता दाखवा जो जनतेत जाईल आणि म्हणेल की मला मतं द्या? दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल ? हे महत्त्वाचं नाही. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टीचं सरकार एक आठवडा, एक महिना कसं चालतं ते महत्त्वाचं आहे. पुढील मुख्यमंत्री कोण याचा निर्णय आमदारांच्या बैठकीत घेतला जाईल. पण दिल्लीची जनता आपच्या पाठिशी आहे असं उत्तर आतिशी ( Atishi ) यांनी दिलं.

आमचा पक्ष तोडण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं

आमचा पक्ष तोडण्याचं षडयंत्र करण्यात आल. आमच्या पक्षातील नेत्यांमध्ये दुरावा कसा निर्माण होईल, संभ्रम कसा निर्माण होईल हे पाहण्यात आलं. एकमेकांच्या विरोधात भडकवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र आमचा पक्ष या सगळ्याला धीराने सामोरा गेला. आम आदमी पक्षाचं हे ऐक्य कायम राहिल. आमच्या या एकीने आणि प्रामाणिकपणाने दिल्लीच्या जनतेचा विश्वास कमावला आहे, असा विश्वास आतिशी ( Atishi ) यांनी व्यक्त केला.