Atishi Marlena To Become New CM of Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने एकमुखाने निवड केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. या पदासाठी आता आतिशी यांचं नाव निश्चित झालं आहे. आतिशी यांच्या नावाची घोषणा होताच आप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल हे आज (१७ सप्टेंबर) उपराज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील. पुढील दोन ते तीन दिवसांत आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
आतिशी या आम आदमी पार्टीमधील वरच्या फळीतील नेत्यांपैकी एक आहेत. तसेच त्या अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर केजरीवाल यांनी शिक्षण मंत्रालयासह सिसोदिया यांच्याकडील खाती व इतर महत्त्वाची खाती आतिशी यांच्याकडे सोपवली होती. आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
आतिशी यांच्याआधी भाजपाच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचं नेतृत्त्व केलं आहे. तसेच इतरही अनेक राज्यांचा कारभार महिला मुख्यमंत्र्यांनी सांभाळला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी या देशातील १६ व्या महिला मुख्यमंत्री ठरतील.
देशातील महिला मुख्यमंत्र्यांची नावं
- सुचेता कृपलानी (काँग्रेस) – उत्तर प्रदेश
- नंदिनी सेतूपती (काँग्रेस) – ओडिशा
- शशिकला काकोडकर – गोवा (महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी)
- अन्वरा तैमूर (आसाम) – काँग्रेस</li>
- व्ही. एन. जानकी (तामिळनाडू) – अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम
- जे. जयललिता (तामिळनाडू) – अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कझगम
- मायावती (उत्तर प्रदेश) – बहुजन समाज पार्टी
- राजिंदर कौर भट्टल (पंजाब) – काँग्रेस
- राबडीदेवी (बिहार) – राष्ट्रीय जनता दल
- सुषमा स्वराज (दिल्ली) – भाजपा
- शीला दीक्षित (दिल्ली)- काँग्रेस
- उमा भारती (मध्य प्रदेश)- भाजपा
- वसुंधरा राजे (राजस्थान) – काँग्रेस
- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) – अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
- आनंदीबेन पटेल (गुजरात) – भाजपा
- महबुबा मुफ्ती (जम्मू काश्मीर) – जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी
- आतिशी (दिल्ली) – आम आदमी पार्टी</li>