धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…!

दिल्ली पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या जान मोहम्मद शेखला अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसचं हे अपयश असल्याची टीका केली जात आहे.

maharashtra ats on jan mohammad shaikh arrest by delhi police 1
महाराष्ट्र एटीएसचा जान मोहम्मद शेखच्या अटकेवर खुलासा!

दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरात राहणाऱ्या जान मोहम्मद अली शेख याला कोटामध्ये रेल्वेमधूनच अटक केली. याची माहिती दिल्ली पोलिसांनी रीतसर पत्रकार परिषद घेऊन दिली. मात्र, यानंतर महाराष्ट्र एटीएसवर टीका केली जाऊ लागली. मुंबईत हा दहशतवादी धारावी परिसरात राहत असून देखील एटीएसला त्याबाबत माहिती नसणे आणि दिल्ली पोलिसांनी त्याला अटक करणे हे महाराष्ट्र एटीएसचं अपयश असल्याची टीका होऊ लागली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून देखील एटीएसवर निशाणा साधण्यात आला. त्यासंदर्भात बोलताना एटीएसचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे.

विनीत अगरवाल यांचा संतप्त सवाल

विनीत अगरवाल यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना एटीएसच्या अपयशांबाबतच्या आरोपांवर संतप्त सवाल उपस्थित केला आहे. “एक व्यक्ती आरोपी आहे. तो धारावीचा राहणारा आहे. तो ट्रेनचं एक तिकीट बुक करतो. त्याच्याकडे मुंबई सेंट्रल ते निजामुद्दीन असं तिकीट आहे. ही ट्रेन कोटाला पोहोचते, तेव्हा त्याला अटक होते. मग हे एटीएसचं अपयश कसं ठरू शकेल? मला हे कळत नाहीये”, असं विनीत अगरवाल म्हणाले.

“आमच्या रडारवर हजारो लोकं आहेत. ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते, तो आमच्या रडारवर असतो. त्याचप्रमाणेच जान मोहम्मद देखील आमच्या रडारवर होता. त्याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. गेल्या २० वर्षांपासून जान मोहम्मद दाऊद गँगच्या संपर्कात होता. मात्र, या प्रकरणाची माहिती आमच्याकडे नाही. या प्रकरणाची जी काही लिंक असेल किंवा माहिती असेल, ती दिल्ली पोलीसच सांगू शकतील. आमच्याकडे असलेली माहिती नेहमीच गुन्ह्याच्या स्वरूपात नोंद होत नाही. अशा लोकांवर निगराणी ठेवली जाते, लक्ष ठेवलं जातं. जान मोहम्मदविषयी आमच्याकडे सगळी माहिती आहे. पण आम्ही ती सार्वजनिक करू शकत नाही. “, असं देखील विनीत अगरवाल यावेळी म्हणाले.

मुंबई दहशतवादी अटक प्रकरण : “जान मोहम्मदनं मुंबईत रेकी केलीच नाही”, एटीएसचा महत्त्वपूर्ण खुलासा!

“मुंबई सुरक्षिच, राज्य देखील सुरक्षित”

“मुंबई सुरक्षित आहे, राज्य देखील सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणतीही शस्त्र किंवा त्यांचा ऑपरेटिव्ह आलेला नाही. हे सगळे इथून दिल्लीला जाणार होते आणि तिथे काही गोष्टी घेणार होते. पण त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली. राज्यात उत्सवांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता की नाही, याविषयी दिल्ली पोलीसच सांगू शकतील”, असं देकील विनीत अगरवाल यावेळी बोलताना म्हणाले.

आशिष शेलार यांनी केली होती टीका

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करताना एटीएसला देखील लक्ष्य केलं होतं. “मुंबईत, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होतं. दिल्लीहून येऊन विशेष पथकानं त्यांना अटक केली. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे, पत्रकारांना हात नाही पाय लावू असं म्हणणारे किंवा राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते?” असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ats chief on delhi police arrested jan mohammad shaikh suspected terrorist from kota pmw