Attack On Arvind Kejriwal : दिल्लीतल्या पदयात्रेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला ( Attack On Arvind Kejriwal ) करण्यात आला आहे. भाजपाने गुंड पाठवून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप आपने केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट लिहून ही माहिती दिली आहे.
मनिष सिसोदियांची पोस्ट काय?
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. भाजपाच्या गुंडांनी हा हल्ला ( Attack On Arvind Kejriwal ) घडवून आणला. जर अरविंद केजरीवाल यांना काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी भाजपाची असेल. आम्ही घाबरणारे लोक नाहीत. आम आदमी पक्षाची जी मोहीम सुरु आहे ती बंद होणार नाही.
हे पण वाचा- चाँदनी चौकातून : केजरीवॉल!
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी काय म्हणाल्या?
भाजपाने आज विकासपुरी या ठिकाणी सुरु असलेल्या पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला घडवून आणला. आधी अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तुरुंगात असताना त्यांचं इन्शुलिनचं इंजेक्शन थांबवून त्यांना मारण्याचा कट रचला. आता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर भाजपाने गुंडांतर्फे अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला ( Attack On Arvind Kejriwal ) केला आहे. भाजपाच्या लोकांनो लक्षात घ्या, दिल्लीचे भाऊ, बहिणी या हल्ल्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्की घेतील. अशी पोस्ट दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला
अरविंद केजरीवाल हे शुक्रवारी दिल्लीतल्या विकासपुरी भागात पदयात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर आपचे सगळे नेते भाजपावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. तसंच अरविंद केजरीवाल यांना काही झालं तर ती जबाबदारी भाजपाची असेल असंही आपचे नेते म्हणत आहेत.
२१ मार्चला अरविंद केजरीवाल यांना अटक, २३ सप्टेंबरला जामीन
अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च २०२४ ला अटक केली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून ते तिहार तुरुंगात होते. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना २१ दिवसांसाठी जामीन मंजूर केला होता. १० मे २०२४ ला दिलेल्या जामिनाची मुदत २ जून २०२४ ला संपली. त्यानंतर केजरीवाल हे तिहार तुरुंगात होते. त्यानंतर १३ सप्टेंबरला अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला. अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती.