हरियाणातील वल्लभगड येथील १५ वर्षीय मुस्लिम मुलाच्या हत्येच्या घटनेवर नरेंद्र मोदी सरकार गप्प असल्याचा आरोप होत असताना भाजप अल्पसंख्याक मोर्चाने मुस्लिमांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांनी आम्ही चिंतीत आहोत, असं अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी यांनी म्हटलं आहे. सरकार त्यांची काळजी घेतंय, असं अल्पसंख्याकांना वाटलं पाहिजे. आपण सुरक्षित आहोत, असं वातावरण निर्माण झालं पाहिजे. सरकारला आपली चिंता आहे, असं मुस्लिमांना वाटलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

भाजप नेते शहानवाझ हुसैन यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त दावत आयोजित केली होती. त्यावेळी अन्सारी बोलत होते. मुस्लिमांवरील हल्ल्यांच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. हरियाणातील वल्लभगड येथे एका १५ वर्षांच्या मुलाची रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून हत्या झाली होती. हल्लेखोर टोळीनं त्यांना मुस्लिम आणि बीफ खाणारे असे संबोधून मारहाण केली होती, अशी माहिती त्यानंतर समोर आली होती. अशा प्रकारच्या घटनांवर अन्सारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. केवळ मुस्लिम म्हणून नव्हे तर भारतीय नागरिक, एका राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून अशा घटनांनी मी चिंतीत आहे. माझा पक्षही या घटनेबाबत चिंतीत आहे, असं अन्सारी म्हणाले. कोणीही भाजप नेते, भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. रेल्वेगाडीत टोळक्याकडून मुस्लिम मुलाची झालेली हत्या ही सरकारचे अपयश असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही, असेही अन्सारी म्हणाले.

पोलिसांनी अशा प्रकारच्या घटना रोखायला हव्यात. पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण तीन-चार पोलीस कर्मचारी शेकडोंच्या जमावासमोर काही करू शकत नाहीत, अशी बाजूही त्यांनी मांडली. गुजरातमध्ये कथित गोरक्षकांनी दलितांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दांत सुनावले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोदींनी कथित गोरक्षकांना सुनावत गोरक्षणाच्या नावाखाली ‘दुकान’ चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते. मोदींनी त्यावेळी असे सांगून कथित गोरक्षकांना कडक संदेश दिला होता, असे अन्सारी म्हणाले. यावर्षी एप्रिलमध्ये भुवनेश्वरमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यातही मोदींनी अल्पसंख्याकांची काळजी घ्या, असे म्हटले होते, असंही अन्सारी यांनी सांगितलं.