‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर फेब्रवारी महिन्यात ते उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर हल्ल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी सचिन आणि त्याच मित्र असलेल्या शुभमला मोठा हिंदुत्वावादी नेता व्हायचं होतं आणि ते ओवेसींच्या भाषणांमुळे अस्वस्थ झाले होते, म्हणून त्यांनी ओवेसींच्या हत्येचा कट रचला होता, असं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रावरून इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

आरोपपत्रानुसार, दोन हल्लेखोरांनी ओवेसींवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. त्यांचा हल्ल्यामागील हेतू हा होता की त्यांना दुसऱ्या धर्मातील एका मोठ्या राजकारण्याची हत्या करून मोठा ‘हिंदुत्ववादी नेता’ बनायचे होते. असे आरोपपत्रात म्हटले आहे.

आरोपपत्रात असे देखील म्हटले आहे की, “ खासदार ओवेसींना पूर्ण तयारीनिशी लक्ष्य करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात कोणी जखमी झाले असते तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असती. काही समाजकंटकांमुळे परिस्थिती आणखी चिघळली असती.”

“ओवेसींना जीवे मारण्यासाठीच गोळ्या झाडल्या;” आरोपींची पोलिसांसमोर कबुली

पोलिसांनी आरोपपत्रात पुरावा म्हणून हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहेत, त्याशिवाय कारची फॉरेन्सिक तपासणी आणि दोन मुख्य आरोपी आणि कथितपणे शस्त्र पुरवठा करणार्‍या व्यक्तीचा जबाब देखील घेण्यात आलेला आहे. आरोपपत्रात खासदार ओवेसी यांच्या जबाबचाही समावेश करण्यात आला आहे. एकूण ६१ लोकाच्या जबाबांचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे.