पीटीआय, बँकॉक : ईशान्य थायलंडमधील एका शहरातील पाळणाघरात झालेल्या गोळीबारात २४ मुलांसह ३५ जणांचा मृत्यू झाला. माजी पोलीस अधिकारी असलेल्या हल्लेखोराने स्वत:च्या कुटुंबाचीही हत्या करून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाँगबुआ लम्फू शहरातील पाळणाघरात स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता हल्लेखोर शिरला. पानिआ कामराप (३४) असे त्याचे नाव असून अमलीपदार्थाशी संबंधित गुन्ह्यात त्याची पोलीस दलातून गतवर्षी हकालपट्टी झाली होती. पाळणाघरात गोळीबार आणि काही जणांवर चाकूचे वार केल्यानंतर हल्लेखोराने तिथून पळ काढला. गोळीबार करतच आपल्या गाडीतून घरी गेला. रस्त्यावरील काही जणांनाही गोळय़ा लागल्या. घरी गेल्यानंतर मुलगा आणि पत्नीची गोळय़ा झाडून हत्या केल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

पाळणाघरात १९ मुले, ३ मुली आणि २ प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला. याखेरीज हल्लेखोर आणि त्याच्या कुटुंबासह १२ जणांचा बळी गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यामध्ये हँडगन, शॉटगन, पिस्तुल आणि चाकू अशा वेगवेगळय़ा हत्यारांचा वापर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत थायलंडमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होते आहे. २०२० मध्ये नाखोन राचासिमा शहरात एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात २९ जणांचा मृत्यू झाला होता. तब्बल १६ तासांच्या ओलिसनाटय़ानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले. गेल्याच महिन्यात थायलंडच्या लष्करी महाविद्यालयात एका कारकुनाने आपल्या दोन सहकाऱ्यांची गोळय़ा झाडून हत्या केली होती.

हृदयद्रावक..

हल्ल्यानंतर पाळणाघरातील दृश्य हृदयद्रावक होते. चिमुरडय़ांना झोपण्यासाठी असलेल्या चटया, चित्रे, रंगीबेरंगी भिंती रक्ताने भरून गेल्या होत्या. एका मृत शिक्षिकेच्या हातामध्ये बाळ होते.. घटनास्थळी धाव घेतलेल्या पालकांचा अनावर झालेला शोक हृदय पिळवटून टाकणारा होता.