लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनी या संघटनेने २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून आपल्या आतापर्यंतच्या रूढ प्रतिमेत आमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. त्यात संघटनेच्या नावासह तिच्या कार्यपद्धतीतही बदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हिंदूंचे रक्षण करण्याच्या नावाखाली बाहूबल आणि लाठय़ाकाठय़ाधारी तरुणांची बेधडक संघटना असे तिचे स्वरूप सर्वज्ञात आहे. परंतु आता ते बदलण्यात येणार आहे. आदित्यनाथ यांनी २००२मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या उत्तर प्रदेशातील सर्व शाखा ३ ऑगस्टला बरखास्त करण्यात आल्या. त्यांची आता पुनर्रचना करून संघटनेत सदस्यनोंदणीचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.