बँकॉक : सध्या लष्करी नियंत्रणाखाली असलेल्या म्यानमारमधील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना सोमवारी येथील न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आणखी चार प्रकरणांत दोषी ठरवून सहा वर्षे तुरुंगवासाची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे, असे विधि अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणांची सुनावणी बंद दाराआड झाली. तेथे नागरिक किंवा माध्यमांना प्रवेश नव्हता. त्याचप्रमाणे सुनावणीची माहिती कुणालाही देऊ नये, असा आदेश सू ची यांच्या वकिलावर बजावण्यात आला होता. सोमवारी सू ची यांना दोषी ठरविण्यात आलेल्या या प्रकरणांत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता की, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी मालकीची जमीन बाजारभावापेक्षा कमी दराने भाडेतत्त्वावर दिली. धर्मादाय हेतूने मिळालेल्या देणग्यांतून या जमिनीवर घरे बांधली जाणार होती. या प्रत्येक प्रकरणात त्यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, पण यापैकी तीन शिक्षा एकेसमयी भोगायच्या आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा वर्षे तुरुंगात काढावी लागतील.

सू ची यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. शिक्षेविरोधात त्यांचा वकील आव्हान याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. सू ची यांना आधीच देशद्रोह, भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणांत ११ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लष्करी राजवट आल्यानंतर त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.

लष्करशहाचा हेतू

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार, सू ची तसेच त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेले विविध खटले म्हणजे सध्याच्या लष्करी सत्तेला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. देशात पुढील वर्षी निवडणुका घेण्याचे आश्वासन लष्करशहाने दिले आहे.  त्याच्या आधीच सू ची यांना राजकारणातून हद्दपार करण्याचा लष्कराचा हेतू आहे.