लंडन : मूळचा ऑस्ट्रेलियाचा असलेला ज्युलियन असांज याला अमेरिकेच्या ताब्यात दिल्यास त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाण्याची शक्यता आहे पण त्याला अशी शिक्षा देण्यास विरोध असल्याचे ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरीस पायने यांनी म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या दूतावास अधिकाऱ्यांनी विकिलिक्सचा संस्थापक असांज याची लंडनच्या तुरूंगात भेट घेण्याचे ठरवले असून त्याला इक्वेडोरच्या दूतावासात अटक करण्यात आली. तो सात वर्षे तेथे लपून बसला होता. आता त्याच्यावर अमेरिकेने संगणक कटाचा आरोप ठेवला असून अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा क्वचितच दिली जाते, पण असांजला ती दिली जाऊ शकते असा त्याच्या समर्थकांचा अंदाज आहे.

पायने यांनी सांगितले, की असांजला मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार नाही असे आश्वासन ब्रिटनने अमेरिकेकडून घेतले आहे. असांज हा त्याला अमेरिकेच्या ताब्यात देण्याच्या कारवाईविरोधात लढा देत आहे. पण ऑस्ट्रेलिया त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नसल्याचे समजते. ऑस्ट्रेलियातील राजकीय नेत्यांनी असांज याच्यावरील कारवाईत मध्यस्थी करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

असांजच्या साथीदारास इक्वेडोरमध्ये अटक

क्विटो : विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांच्या सहकाऱ्यास  गुरुवारी इक्वेडोरमध्ये अटक करण्यात आली असून तो जपानमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, असे इक्वेडोरच्या अंतर्गत सुरक्षा मंत्री मारिया पौला रोमो यांनी सांगितले. त्यांनी सोनोरामा रेडिओला दिलेल्या माहितीत त्याचे नाव मात्र उघड केलेले नाही, पण अटक केलेली व्यक्ती असांजची सहकारी आहे.

असांज याला आधी लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. तो गेली सात वर्षे इक्वेडोरच्या दूतावासात राहात होता. दरम्यान त्याच्या ज्या सहकाऱ्यास इक्वेडोरने अटक केली आहे त्याचे नाव ओला बिनी असे असून तो सॉफ्टवेअर निर्माता आहे. त्याने व्यक्तिगतता, सायबर सुरक्षा, क्रिप्टोग्राफी यावर सॉफ्टवेअर तयार केली आहेत, अशी माहिती टेलेमॅझोनस वाहिनीने म्हटले आहे.

अध्यक्ष लेनिन मोरेनो यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न ओला बिनी याने केल्याचा आरोप मंत्र्यांनी गुरुवारी केला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असून तो इक्वेडोरचे माजी परराष्ट्र मंत्री रिकाडरे पॅटिनो यांच्या समवेत परदेश दौऱ्यावर गेला होता. त्यांनीच असांजला २०१२ मध्ये आश्रय दिला होता.

सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न बिनी याने केल्याचे पुरावे आहेत असे त्या म्हणाल्या. इक्वेडोरने आश्रय काढून घेतल्यानंतर  ब्रिटीश पोलिसांनी असांजला अटक केली असून २०१२ मध्ये दिलेले नागरिकत्व इक्वेडोरने काढून घेतले आहे. असांज हा इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात राहात होता. त्याने आश्रयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे इक्वडोरने म्हटले आहे.