Australian Nurses Death Threat To Israeli Patients : सिडनीतील बँकस्टाउन हॉस्पिटलमध्ये कामाच्या शिफ्ट दरम्यान इस्रायली रुग्णांना जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यू साउथ वेल्सच्या दोन आरोग्य परिचारिकांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अहमद रशाद नादिर आणि सारा अबू लेबदेह यांनी व्हिडिओ चॅट दरम्यान या घृणास्पद टिप्पण्या केल्या होत्या. इस्रायली सोशल मीडिया एनफ्ल्युएन्सर मॅक्स व्हेफर यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते इस्रायली नागरिकांवर उपचार करण्यास नकार देत असल्याचे दिसत आहे.

“मी त्याला मारून टाकेन”

हा व्हिडिओ एका रुग्णालयात चित्रित केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये डॉक्टर असल्याचा दावा करणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला म्हणतो की, “तुझे डोळे सुंदर आहेत. मला माफ करा तू इस्रायली आहेस.” त्यानंतर तो गळा दाबल्याचे हावभाव करतो, त्यानंतर एक महिला स्क्रीनवर येते आणि म्हणते की “एक दिवस याची वेळ येईल आणि तो मरेल. मी तुझ्यावर उपचार करणार नाही, मी तुला मारून टाकेन.”

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून संताप

हे प्रकरण समोर आल्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले आहे की, “द्वेषाने प्रेरित या यहूदीविरोधी टिप्पण्यांना आमच्या आरोग्य व्यवस्थेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थान नाही. यहूदीविरोधी गुन्हेगारी कृत्ये केलेल्या व्यक्तींना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

आरोग्यमंत्र्यांकडून कारवाई

दरम्यान न्यू साउथ वेल्सचे आरोग्यमंत्री रायन पार्क म्हणाले की, “या घटनेमुळे रुग्णावर कोणतेही प्रतिकूल परिणाम झाले नाहीत याची खात्री करण्यासाठी चौकशी करण्यात येणार आहे.” आरोग्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या दोन्ही परिचारिकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांना पुन्हा कधीही न्यू साऊथ वेल्सच्या आरोग्य सेवेत नोकरी मिळणार नाही.

ऑस्ट्रेलियात यहुद्यांवर हल्ले वाढले

इस्रायल आणि हमासा यांच्यात सुरू झालेल्या युद्धानंतर ऑस्ट्रेलियामध्ये यहुद्यांवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियातल यहुदी लोकांच्या सिनेगॉग, इमारती आणि गाड्यांवर हल्ले झाले आहेत.

“आज सकाळी बँक्सटाउन पोलीस एरिया कमांडने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची चौकशी सुरू केली,” असे न्यू साउथ वेल्स पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Story img Loader