ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाच्या भावाला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी अटक केली. दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणांची बनावट यादी केल्याप्रकरणी ख्वाजाच्या भावाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३९ वर्षीय अर्साकन ख्वाजाला सिडनी येथून अटक करण्यात आली. न्यायालयीन कामकाजावर प्रभाव टाकण्यासाठी बनावट दस्तऐवजांचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये न्यू साऊथ वेल्स विद्यापीठ परिसरात मिळालेल्या एका दस्तऐवजावरुन ही अटक करण्यात आली होती. यामध्ये दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याच्या योजनेचा उल्लेख होता. एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अर्साकन ख्वाजा विद्यापीठात २५ वर्षी मोहम्मद कमेर निजामुद्दीनचा सहकारी आहे. निजामुद्दीनला दहशतवाद्यांच्या यादीप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर मिळालेले दस्तऐवज आणि निजामुद्दीनचे हस्ताक्षर जुळत नसल्याचे समोर आले होते.

हे दस्तऐवज लिहिण्याचा हेतू अद्याप सिद्ध झालेला नाही. अटकेनंतर मंगळवारी दुपारी अर्साकन ख्वाजाला पॅरामाटाच्या स्थानिक न्यायालयात सादर करण्यात आले. तिथे कडक अटींवर त्याला जामीन मिळाला. त्याला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा दुखापतीमुळे गेल्या अनेक कोळांपासून संघाबाहेर आहे. गुरुवारी भारताविरोधात सुरु होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला पुनरागमनाची संधी आहे.

‘पर्थ नाऊ’ला दिलेल्या एका मुलाखतीत उस्मान ख्वाजा म्हणाला की, मी याबाबत जास्त काही सांगू शकत नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. माझ्या कुटुंबाच्या खासगीपणावर गदा आणू नका.

उस्मान ख्वाजाने आतापर्यंत ३५ कसोटी सामन्यात ४३.८३च्या सरासरीने २४५५ धावा काढल्या आहेत.