गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमधील एक रिक्षा चालक सध्या बराच चर्चेत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विक्रम दंताणी या रिक्षा चालकाने काही दिवसांपूर्वी जेवणासाठी आमंत्रित केले होते. या रिक्षा चालकाने शुक्रवारी भाजपाच्या सभेत हजेरी लावली. ‘हम तो मोदी साहब के आशिक है’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहमदाबादेतील सभेत विक्रम दंताणी भाजपाची टोपी घालून वावरताना दिसले.

अरविंद केजरीवालांची ‘लंच डिप्लोमसी’, गुजरातमधील दलित तरुणाला दिल्लीत मेजवानी

“मी राहत असलेल्या ठिकाणी सर्व मोदींना मतदान करतात. मी नेहमीच भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये जात असतो. भाजपासोबत खूप आधीपासून असून या पक्षाला नेहमी पाठिंबा देतो”, असे दंताणी यांनी म्हटले आहे. ऑटो युनियनच्या सांगण्यावरुन अरविंद केजरीवाल यांना मेजवानीला बोलवल्याचे दंताणी यांनी यावेळी स्पष्ट केले. या मेजवानीनंतर कोणाशीही चर्चा झाली नाही, असेही दंताणी यांनी माध्यमांना सांगितले आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्यांनी एकदा ‘वंदे भारत’ ट्रेनने प्रवास केला तर..; पंतप्रधान मोदींचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी अहमदाबादेत रिक्षा चालकांच्या एका सभेला संबोधित केले होते. यावेळी घाटलोदिया परिसरात राहणाऱ्या विक्रम दंताणी यांनी केजरीवाल यांना घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. “पंजाबमधील एका रिक्षाचालकाच्या घरी तुम्ही जेवण केलं, हे मी सोशल मीडियावर पाहिले होते. त्याचप्रकारे तुम्ही माझ्याकडेही जेवायला याल का?” अशी विनंती दंताणी यांनी केजरीवाल यांना केली होती. या विनंतीचा मान ठेवत अरविंद केजरीवाल यांनी दंताणी यांच्याकडे मेजवानीला हजेरी लावली होती.