देशभरात ‘इंडिगो’ विमान कंपनीच्या मंगळवारपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर इतर कंपन्यांनी तिकिटांच्या दरात भरमसाट वाढ केली. मुंबई-पुणे प्रवासासाठी एक लाख, तर मुंबई-नागपूर प्रवासासाठी ३९ हजार रुपये आकारले जात होते. याची दखल घेत शनिवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान भाडेमर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच रद्द केलेल्या तिकिटांचा परतावा रविवारी रात्री आठपर्यंत करण्याचा आदेशही ‘इंडिगो’ला देण्यात आला.
देशातील प्रवासी विमान वाहतूक क्षेत्रात जवळपास दोन तृतीयांश हिस्सा असलेली आणि दररोज २३०० विमान उड्डाणे चालवणारी सर्वात मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ला, नवीन नियमांअंतर्गत वैमानिकांसाठी अनिवार्य वाढीव विश्रांती द्यावी लागत असल्यामुळे वैमानिकांचा विलक्षण तुटवडा जाणवत आहे. या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून शेकडो उड्डाणे रद्द होत आहेत. याचा प्रचंड मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत असताना, त्या जोडीला इतर विमान कंपन्यांनी प्रचंड भाडेवाढ केल्याने हालात भर पडली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याची गंभीर्याने दखल घेत योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी नियामक अधिकारांचा वापर केला. ‘परिस्थिती स्थिर होईपर्यंत भाडेमर्यादा लागू राहतील. सर्व विमान कंपन्यांनी निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोर पालन करावे,’ असेही बजावले. तसेच ‘इंडिगो’ कंपनीला तिकिटाचा परतावा तातडीने करण्याबरोबरच प्रवाशांचे सामान दोन दिवसांत देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही विलंबाविना ही प्रक्रिया पार पाडावी अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्रालयाने दिला.
रद्द केलेल्या विमानांच्या तिकिटाचे पैसे कोणत्याही विलंबाविना रविवार रात्री आठपर्यंत परत द्यावेत. त्यासाठी कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये. अन्यथा कारवाई केली जाईल. तसेच ‘इंडिगो’ने या प्रक्रियेसाठी प्रवासी सहाय्यता केंद्र स्थापन करावे. – नागरी विमान वाहतूक मंत्रालय
‘एअर इंडिया’चा पुढाकार
प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘एअर इंडिया समूहा’ने ‘एअर इंडिया’ आणि ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ या दोन्ही कंपन्यांच्या ‘इकॉनॉमी क्लास’च्या भाड्यावर मर्यादा घातल्या. सरकारने भाडेमर्यादा लागू केल्यानंतर तत्काळ कंपनीने निवेदन प्रसिद्ध केले. प्रवासी आणि त्यांचे सामान शक्य तितक्या लवकर अपेक्षित स्थळी पोहोचण्यासासाठी ‘एअर इंडिया’ आणि ‘एअर इंडिया एक्सप्रे’स क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
मोदींनी हवाई प्रवासच बंद केला : काँग्रेस
देशभरातील हवाई वाहतुकीचा फज्जा उडाला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना प्रवास सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. उड्डाणे होत नसतील तर प्रवास कसा करणार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू या अभूतपूर्व गोंधळाची जबाबदारी घेतील का असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. ‘इंडिगो’चा हा गोंधळ अपघाती नसून, भाजप सरकारच्या या क्षेत्रातील चुकीच्या धोरणांचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
रेल्वेच्या ८४ विशेष गाड्या
हैदराबाद : हवाई वाहतुकीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने शनिवारी सर्व विभागांमध्ये ८४ विशेष गाड्यांची घोषणा केली. तसेच नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरु, पाटणा आणि हावडा यासारख्या प्रमुख शहरांसाठी कमी वेळेत १०४ फेऱ्या चालवण्यात आल्या. तसेच हैदराबादहून चेन्नई, मुंबई आणि शालिमार (कोलकाता) शनिवारी विशेष गाड्या चालवण्यात आल्या. तर बेंगळुरू-चेन्नई, बेंगळुरू-पुणे, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन, शालीमार-येलाहंका आणि एर्नाकुलम-येलाहंका यासारख्या अधिक मागणी असलेल्या मार्गांवर ६ ते १० डिसेंबर दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, असे रेल्वेने म्हटले आहे.
भाडेमर्यादा
अंतर (किमी) कमाल भाडे
५०० ७५०० रु.
५०० ते १००० १२००० रु.
१००० ते १५०० १५००० रु.
१५००हून अधिक १८००० रु.
ही मर्यादा बिझनेस श्रेणीसाठी आणि संलग्न (कनेक्टेड) विमान उड्डाणांना लागू नाही.
