Avinash Narne case : गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरी देखील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. दररोज गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. आता अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमेरिकेत एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. खून केल्यानंतर पत्नीच्या मृतदेहाचा फोटो भारतात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेत राहणाऱ्या एका ३० वर्षीय भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश नार्ने अशी आरोपीची ओळख पटली असून त्याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. अविनाश राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये पत्नीचा मृतदेह आढळल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

२७ ऑक्टोबर २०२५ रोजी नेमकं काय घडलं?

वॉशिंग्टनमधील बेल्व्ह्यू पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश नार्ने याने त्याची पत्नी राजिता सबिनेनी हिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी अविनाशने पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की, त्याची पत्नी बाथरूममध्ये अडकली असून ती बाहेर येत नाही. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा अविनाशची पत्नी जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं.

या संपूर्ण घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने सुरुवातीला पोलिसांना सांगितलं की, काही कामांसाठी तो २७ ऑक्टोबर रोजी अपार्टमेंटमधून बाहेर गेला होता. त्यानंतर साधारण ४० मिनिटांनंतर घरी परतला, पण तेव्हा त्याची पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचं आढळून आलं होतं. या घटनेला आता ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून पोलिसांनी अविनाशवर पत्नीच्या हत्येचा आरोप ठेवत अटकेची कारवाई केली आहे.

अविनाश घराच्या बाहेर असताना त्यांच्या घरात दुसऱ्या कोणीही प्रवेश केल्याचं अधिकाऱ्यांना तपासात आढळून आलं नाही. मात्र, शवविच्छेदन अहवालातून अविनाशच्या पत्नीचा गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता तपासातून धक्कादायक माहिती समोर आली.

पत्नीच्या मृतदेहाचा फोटो गर्लफ्रेंडला पाठवला

तपासामधून अशी माहिती समोर आली की, अविनाशचे भारतातील एका महिलेशी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच ५ जून २०२५ रोजी अविनाश याचं राजिताशी लग्न झालं होतं. मात्र, लग्न झाल्यानंतरही त्याचे प्रेमसंबंध कायम होते. तसेच त्याची प्रेयसी त्याच्या लग्नालाही उपस्थित राहिली होती. दरम्यान, गुन्ह्याच्या दिवशी अविनाशने प्रेयसीला किमान चार वेळा फोन केला होता. तसेच त्याने आपल्या पत्नीच्या मृतदेहाचा फोटोही प्रेयसीला पाठवला होता अशी माहिती तपासात समोर आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

पत्नीकडून कडू पेयाबद्दल अनेकदा तक्रारी

पोलिसांनी तपास केला असता अविनाश आणि त्याच्या पत्नीमधील काही टेक्स्ट मेसेजेस देखील आढळून आले आहेत. यामध्ये अनेकदा अविनाशच्या पत्नीने अविनाशकडे पेयांची चव कडू लागत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात ५ जुलै रोजी अविनाशवर फर्स्ट-डिग्री मर्डर म्हणजे पूर्वनियोजित हत्या केल्याचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. तसेच आरोपीला ५ दशलक्ष डॉलर्सच्या जामिनाच्या अटीवर कोठडीत ठेवण्यात आलं आहे.