महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल असे वक्तव्य करण्याचे टाळावे, अशी ताकीद निवडणूक आयोगाने बिहारमधील उमेदवार व राजकीय पक्षांना दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयोगाने हा इशारा दिला आहे.
प्रचाराचा दर्जा उच्च राखावा, असे आवाहनही आयोगाने केले आहे. असभ्य भाषा वापरून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. गेल्या काही निवडणुकांमधील अनुभव पाहता असे आवाहन केल्याचे आयोगाने
सांगितले. महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात अशी भाषा वापरण्याच्या तक्रारी आल्या होत्या, असे आयोगाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. राजकीय पक्षांनीही याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाने याबाबत गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षांना पत्र पाठवल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. निवडणूक आयोग भाषण स्वातंत्र्याचा आदर करते मात्र काही मर्यादा पाळल्या पाहिजेत असे आयोगाने स्पष्ट केले आहे.