Thalapathy Vijay’s TVK: अभिनयात यशस्वी ठसा उमटवल्यानंतर राजकारणात पदार्पण केलेल्या थलपती विजय यांनी पहिल्याच निवडणूक तमिळनाडूमध्ये घवघवीश यश संपादन केले आहे. थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश संस्थांनी टीव्हीकेला ४० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत असा अंदाज वर्तवला होता. याला केवळ ‘ॲक्सिस माय इंडिया’ ही संस्था अपवाद होती. ‘ॲक्सिस माय इंडिया’ने टीव्हीके १०० हून अधिक जागा मिळवेल असा अंदाज वर्तवला होता आणि आता त्यांचा हा अंदाज खरा ठरत असताना दिसत आहे.

ॲक्सिसचा अंदाज

एक्झिट पोलमध्ये अनेकांनी तमिळनाडूमध्ये स्टॅलिन पुन्हा सत्ता स्थापन करतील असा अंदाज वर्तवला होता. पण, ‘ॲक्सिस माय इंडिया’ने टीव्हीकेला ९८ ते १२० जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली होती. दरम्यान, ॲक्सिसच्या या भाकीतावर अनेकजण हसले होते अशी प्रतिक्रिया ‘ॲक्सिस माय इंडिया’चे प्रदीप गुप्ता यांनी एनडीटीव्हीला दिली. दरम्यान, दुपारी चार वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांनुसार थलपती विजयच्या पक्षाला शंभरहून अधिक जागांवर आघाडी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रदीप गुप्ता काय म्हणाले?

“हा डेटा सायन्सचा विजय आहे. आम्ही प्रत्येकवेळी प्रत्येक मतदारसंघात जात असतो. अनेक एक्झिट पोल देणाऱ्या संस्थांचे अंदाज बरोबर का येत नाहीत, किंवा त्यांना जनतेचा मूड का कळत हे आता लक्षात आले असेल”, असे गुप्ता एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “संपूर्ण देशात कोणालाच यावर विश्वास बसत नव्हता. आम्ही तमिळनाडूचा अंदाज वर्तवला, थलपती यांच्या विजयाची शक्यता वर्तवली त्यावेळी अनेकांना हा अंदाज वरवरचा वाटत होता. राजकीय पंडीत, निरीक्षक आणि इतर संस्था आमच्यावर हसत होते”, असेही गुप्ता म्हणाले.

अंदाज खरा ठरल्याचा दावा

“डिएमके यांच्या आघाडीला दुय्यम लेखण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला मात्र आम्ही त्या पक्षा ३२ टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. तसेच. एआयएडीएमके आघाडीसाठी २३ टक्क्यांचा अंदाज वर्तवला होता. तो पक्ष सध्या २७ टक्क्यांवर आहे. स्टॅलिन यांच्या डिएमके पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची तर एआयएडीएमकेला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळतील”, असेही गुप्ता म्हणाले.

Tamil Nadu Result 2026
Tamil Nadu Result 2026 (फोटो – Election Commission)

थलपती यांच्या विजयाची कारणे काय?

प्रदीप गुप्ता यांच्या मते थलपती विजय यांच्या मागे युवाशक्ती मोठ्या संख्येने उभी राहिली. ४२ टक्के मतदारांमध्ये १८ ते ३९ वयोगटातील मतदार आहेत. यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे गुप्ता सांगतात. डिएमके यांच्यानंतर महिलांचे सर्वाधिक मतदान थलपती यांच्या टीव्हीकेच्या पारड्यात पडेल असा अंदाजही ॲक्सिसने वर्तविल्याचा दावा गुप्ता यांनी केला.