Middle East Crisis : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला असल्याने आता मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पश्चिम आशियात २८ फेब्रुवारीपासून धगधगत असलेल्या युद्धाला काही दिवसांपूर्वी पूर्णविराम मिळाला होता. अमेरिका आणि इराणने शांतता करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. पण दोन्ही देशातील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आणि त्यानंतर अमेरिका-इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा वाढला आहे.

अमेरिका आणि इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ही मोडला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हे युद्ध नेमकं कधी थांबणार? हे सध्या तरी कोणीही सांगू शकत नाही. दरम्यान, जेव्हा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केला होता, त्या हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलला पहिल्याच हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांना ठार करणं नेमकं कसं शक्य झालं? अमेरिका आणि इस्रायलने अयातुल्ला अली खामेनी यांना नेमकं कसं शोधलं? अमेरिका-इस्रायलला अयातुल्ला अली खामेनी यांचा ठिकाणा कसा लागला? याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत इराणकडून पहिल्यांचाच अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मोठा खुलासा केला आहे. अमेरिका आणि इस्रायलला अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करणं कसं शक्य झाल? इराणची नेमकं कुठे चूक झाली? याबाबत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पहिल्यांदा भाष्य केलं आहे.

इराणची कुठे चूक झाली? परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा

अयातुल्ला अली खामेनी यांच्या घरावर बॉम्बफेक करणं हे अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे शक्य झाल्याची मोठी कबुली परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिली आहे. अराघची यांनी दावा केला की, अयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानावर अमेरिकेला बॉम्ब टाकणं हे इराणच्या सुरक्षा त्रुटीमुळे शक्य झालं. आजही या त्रुटी कायम आहेत. या त्रुटीमुळे अमेरिका आणि इस्रायलला माहिती मिळवणं आणि संघर्षादरम्यान निर्णय प्रक्रियेवर त्याचा प्रभाव टाकणं शक्य होतं, असा खुलासा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

अमेरिका-इस्रायलला बैठकीची आधीच माहिती होती

“अमेरिका-इस्रायलला आमच्या बैठकांबाबतची माहिती आधीच होती. याचं कारण कदाचित सुरक्षेतील त्रुटी असू शकतात, ज्या अजूनही अस्तित्वात असाव्यात, याचा शोध आमच्या सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. मला वाटतं की ही सुरक्षा त्रुटी केवळ घुसखोरी आणि माहिती मिळवण्यापुरती मर्यादित नसून निर्णय आणि आमच्या मानसिक वातावरणाला दिशा देण्यातही तिची भूमिका आहे”, असं सूचक भाष्य इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं.

अमेरिकेला खामेनींच्या दिनचर्येची माहिती होती?

परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी असाही दावा केला की, अमेरिका-इस्रायलला अयातुल्ला खामेनींच्या दैनंदिन दिनचर्येची माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्यानुसार त्या ठिकाणाला टार्गेट केलं. तसेच शत्रूंना समजलं होतं की, त्यांच्या जवळ कमांडर्सची बैठक होत आहे, त्यामुळे त्यांनी हल्ल्यासाठी तीच वेळ निवडली”, असंही अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलं आहे.