Ayatollah Ali Khamenei Destroyed House Video: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवाचा आज दफनविधी पार पडणार आहे. २८ फेब्रुवारी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी खामेनी यांचा मृत्यू झाला. चार महिन्यांनी संघर्ष निवळल्यानंतर इराणने शासकीय इतमामात खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. खामेनी ज्या हल्ल्यात ठार झाले त्या बेचिराख घराचा व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. उद्ध्वस्त भिंती, कोसळलेले मजले आणि पूर्णपणे बेचिराख झालेले खामेनींचे अखेरचे निवासस्थान या व्हिडीओत दिसत आहे.
इराणकडून व्हिडीओ शेअर
इराणच्या सरकारी माध्यमांनी खामेनींच्या उद्ध्वस्त घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. तेहरानमध्ये खामेनी ज्या कम्पाऊंडमध्ये राहत होते तिथे अमेरिका – इस्रायलने अचूक हल्ला केला होता. यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय ठार झाले होते. यामध्ये त्यांची १४ महिन्यांच्या नातीचा देखील समावेश होता. याच हल्ल्याच इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते आणि अयातुल्ला यांचे पुत्र मोजतबा खामेनी देखील जखमी झाले होते.
व्हिडीओत काय?
इराणने पहिल्यांदाच प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओत खामेनींचा मुक्काम असलेल्या कम्पाऊंडला प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३५ सेकंदाच्या या व्हिडीओत कम्पाऊंडमधील खोमेनी हुसैनिया हॉलला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इमारतीच्या भिंती कोसळल्या आहेत, बीमला मोठे नुकसान झाले आहे. तर, इमारतीचे बांधकाम खाली कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
आज दफनविधी
व्हिडीओत दिसणारा हॉलचा वापर अयातुल्ला अली खामेनी गुप्त बैठक घेण्यासाठी करत होते, अशी माहिती समोर आली आहे. खामेनी यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडणार आहे, त्याच दिवशी इराणने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. मश्शाद या मूळ गावी खामेनी यांचा दफनविधी पार पडेल. दफनविधीपूर्वी खामेनी यांची इराणच्या प्रमुख शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. आठवडाभर निघालेल्या अंत्ययात्रेनंतर आज त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी होणार आहे. खामेनी यांच्या अंत्यसंस्कारात लाखो नागरिकांनी सहभाग घेतला होता.
पुन्हा युद्धजन्य परिस्थिती
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेल्या अमेरिका – इराणमध्ये पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. इराण माझ्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप देखील ट्रम्प यांनी केला आहे. ताज्या अपडेटनुसार, इराण करार करण्यासाठी तयार झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
