Ayatollah Ali Khamenei funeral: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी केलेल्या या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि इतरही बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. पण, अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर आजवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते, अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर खामेनींचे पार्थीव इराणच्या मशहद शहरातील इमाम रझा यांच्या दर्ग्याजवळ दफन केले जाईल. खामेनींच्या अंत्यविधीला अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आयआरजीसीने व्यक्त केली आहे.

खामेनी यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

इराणचे सर्वोच्च अयातुल्ला अली खामेनी एका सुरक्षित बंकरमध्ये गुप्त बैठक घेत असताना अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता खामेनींचा अंत्यविधी होणार असून, यासाठी सुमारे दोन कोटी नागरिक हजेरी लावण्याची शक्यता आहे. देशाच्या विविध ठिकाणांवरुन नागरिक या तीन दिवसीय अंत्यविधीत सहभाग घेतील. हत्येनंतर खामेनी यांचा मृतदेह कुठं ठेवण्यात आलाय? याची काहीच माहिती समोर आली नव्हती. अखेर चार महिन्यांनंतर इराणी प्रशासन खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहे.

अभूतपूर्व गर्दीची शक्यता

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, खामेनी यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. अंत्ययात्रा संपन्न झाल्यानंतर मशहद शहरातील इमाम रझा यांच्या दर्ग्याजवळ खामेनी यांचा दफनविधी पार पडेल. धार्मिक महत्व असणाऱ्या कोम आणि मशहद शहरातून खामेनींची अंत्ययात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती आयआरजीसीने दिली आहे. इराणचे संस्थापक अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी १९८९ मध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. पण, या अंत्यविधीला गर्दीचा पूर्वीचा विक्रम मोडीत निघण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुलगा अयातुल्ला उपस्थित राहणार का?

अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर मुलगा मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. पण, मोजतबा यांची निवड झाल्यापासून एकदाही त्यांनी सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवली नाही. दरम्यान, मोजतबा देखील २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचे अनेक वृत्त समोर आलेत. मोजतबा कोमात असल्याचे तसेच, त्यांच्यावर प्लॅस्टिक सर्जरी झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता वडील अयातुल्ला यांच्या अंत्यविधीसाठी तरी मोजतबा हजेरी लावणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.