Iran’s Supreme Leader Ayatollah Khamenei’s wife Dead : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पत्नी मन्सुरेह खोजस्ते बागेरजादेह यांचाही अमेरिका-इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराणचे अधिकृत प्रसारक ‘प्रेस टीव्ही’ने सोमवारी याबाबत माहिती दिली. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी केलेल्या हल्ल्यात खामेनी मारले गेले होते. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, खोजस्ते याच हल्ल्यांच्या मालिकेत जखमी झाल्या होत्या आणि नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अयातुल्ला खामेनी हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यातच मारले गेले. अमेरिका आणि इस्रायली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे हल्ले धोरणात्मक लष्करी आणि सुरक्षा तळांना लक्ष्य करून करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तापालटाच्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली होती.

संपूर्ण कुटुंब ठार?

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य, त्यांची मुलगी, जावई आणि नात यांचाही मृत्यू झाला आहे. यंग जर्नलिस्ट क्लबच्या माध्यमातून ‘रॉयटर्स’ने तेहरान महानगरपालिकेच्या एका सदस्याने यापूर्वीच सर्वोच्च नेत्याच्या विस्तारित कुटुंबातील मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.

खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली रझा अराफी यांची इराणच्या नेतृत्व मंडळात न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खामेनी यांच्यानंतर नवे नेतृत्व नियुक्त होईपर्यंत ते हंगामी कारभार सांभाळतील. ‘आयएसएनए’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इराणच्या नव्या नेतृत्वाने चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ही चर्चा तातडीने व्हायला हवी अशी अपेक्षा ट्रम्प यांनी अटलांटिक नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र ही चर्चा कुणाशी आणि केव्हा होणार हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.

खामेनी यांच्या जागेवर अली रझा अराफी

ट्रम्प यांनीही खामेनी यांच्या मृत्यूची घोषणा करताना इराणच्या जनतेने त्यांच्या देशाची सूत्रे हाती घ्यावीत, असे आवाहन केले. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या लष्करी आणि सरकारी आस्थापनांवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे ४८ नेते ठार झाल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. आवश्यकतेनुसार, पुढील आठवडाभर इराणवर जोरदार बॉम्बहल्ले होत राहतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराणने या हल्ल्यांमध्ये दोनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.