Ayodhya Hospital Negligence: ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात आमिर खानचं रँचो हे पात्र व्हिडीओ कॉलवरून सूचना घेऊन गर्भवती महिलेची प्रसूती करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण चित्रपटात जे दाखवलं जातं, ते सारं खरं आणि शक्य असतंच असं नाही याचं नुकतंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. अयोध्येमध्ये एका डॉक्टरनं फोनवर सूचना देऊन एका शिकाऊ स्टाफकडून गर्भवती महिलेची प्रसूती करवून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न सदर गर्भवती महिला व तिच्या नवजात अर्भकाच्या जिवावर बेतला. या धक्कादायक प्रकारात महिला व तिचं बाळ या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली असून संबंधि रुग्णालयाला पोलिसांनी टाळं लावलं आहे.

अयोध्येत नेमकं घडलं काय?

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अयोध्येतील एका ३२ वर्षीय गर्भवती महिलेला पोटात वेदना होत असल्यामुळे शहरातील माँ परमेश्वरी देवी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथल्या महिला डॉक्टरने गर्भवती महिलेची प्रकृती व्यवस्थित असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण काही वेळानंतर महिलेला पुन्हा प्रसूती वेदना व्हायला लागल्या. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शिकाऊ स्टाफने प्रसूती शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कुटुंबीयांचा आरोप काय?

दरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय व संबंधित महिला डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यावेळी महिलेवर प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा रुग्णालयात डॉक्टर उपस्थितच नव्हते. रुग्णालयातील महिला डॉक्टरने फोनवर रुग्णालयातील शिकाऊ स्टाफला सूचना दिल्या व त्यानुसार सदर स्टाफने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

“तासाभराने रुग्णालयातील स्टाफने आम्हाला बाळ आणून दिलं आणि ते श्वासोच्छवास करत नसल्याचं सांगितलं. आम्ही जेव्हा बाळाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेलो, तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. आम्ही जेव्हा पहिल्या रुग्णालयात परत आलो, तेव्हा माझ्या पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तिलादेखील दुसऱ्या रुग्णालयात नेलं असता तिथे मृत घोषित करण्यात आलं”, असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे.

आरोग्य विभागाच्या तपासणीत धक्कादायक खुलासे!

आरोग्य विभागाच्या एका पथकाने सदर रुग्णालयात पाहणी केली असता तिथला धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला. अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनुसार, रुग्णालयात एकही वरीष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हते. शिवाय, रुग्णालयाच्या मॅनेजरच्या भरंवश्यावर सर्व रुग्णांना सोडून देण्यात आलं होतं. पीडित महिलेव्यतिरिक्त त्या रुग्णालयात तीन इतर महिलाही होत्या ज्यांची प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण त्या तिघांनाही याच मॅनेजरच्या भरवश्यावर रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं.

सदर रुग्णालयाला प्रशासनाने टाळं ठोकलं असून तेथील महिला रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात पुढील तपास चालू असून रुग्णालयावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.