scorecardresearch

“…माझी हत्या झाली तरी बेहत्तर”, घरावर हल्ला झाल्यानंतर संजय सिंग यांचं भाजपाला जाहीर आव्हान

“जीव गेला तरी प्रभू श्रीरामाच्या नावे निधी चोरी होऊ देणार नाही,” संजय सिंग आक्रमक

“…माझी हत्या झाली तरी बेहत्तर”, घरावर हल्ला झाल्यानंतर संजय सिंग यांचं भाजपाला जाहीर आव्हान
अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला

Ayodhya Land Deal: अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंग यांनी भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. संजय सिंग यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार नाही!

संजय सिंग यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. संजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणाऱ्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर”.

काय आहे प्रकरण –

राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मात्र, हे आरोप ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले आहेत. खुल्या बाजारातील किमतीपेक्षा कमी दराने ट्रस्टने जमीन खरेदी केली असून, राजकीय द्वेष पसरवण्यासाठी बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा चंपत राय यांनी निवेदनाद्वारे केला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी कॉंग्रेससह विरोधकांनी केली आहे.

“मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप

लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंग आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली. त्याबाबत चंपत राय यांनी निवेदन प्रसृत केले. ‘‘गेले १०० वष्रे आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमीचा दावा वैध असल्याचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्यानंतर अयोध्येत जमीन खरेदीसाठी देशातील असंख्य लोक येऊ लागले. उत्तर प्रदेश सरकारही अयोध्येच्या सर्वागीण विकासासाठी मोठय़ा प्रमाणावर जमीन खरेदी करत आहे. जमीन खरेदीसाठी चढाओढ लागल्याने अयोध्येतील जमिनींच्या किमती वाढल्या. ज्या कथित भूखंडाच्या खरेदीबाबत आरोप केले जात आहेत, ती जमीन रेल्वे स्टेशनजवळ अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये राम मंदिर उभारणीसाठी १५ सदस्यांच्या न्यासाची स्थापना केली. मंदिर उभारणीसंदर्भातील सर्व अधिकार या ट्रस्टकडे देण्यात आले आहेत.

“इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी”

कथित वाद निर्माण झालेली जमीन विद्यमान मालकाने काही वर्षांपूर्वी नोंदणीमूल्य देऊन खरेदी केली होती. या मालकाने १८ मार्च २०२१ रोजी विक्रीपत्र (सेल डीड) केल्यानंतर ट्रस्टशी जमीन विक्रीचा करार केला. राम मंदिराच्या परिसराचा विकास करण्यासाठी राम जन्मभूमीच्या आसपास असणारी जमीन खरेदी करावी लागत आहे. जमीन खरेदीपश्चात मूळ मालकांचे पुनर्वसनही केले जाणार आहे. या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार परस्पर संवाद व सहकार्यातून होत आहेत. मूळ मालकांच्या अनुमतीनंतर सहमतीपत्रावर स्वाक्षरी केली जाते. हे व्यवहार करताना न्यायालयीन शुल्क, मुद्रांक शुल्क आदींचे व्यवहार ऑनलाइन केले जात आहेत. खरेदीमूल्य मूळ मालकांना ऑनलाइन हस्तांतरित केले जात आहेत, असे स्पष्टीकरणही श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने महासचिव चंपत राय यांनी निवेदनात दिले आहे.

आरोप काय?

‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या दाव्यानुसार, राम जन्मभूमीलगत असणाऱ्या या जमिनीची १८ मार्च २०२१ रोजी खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आणि त्या वेळी जमिनीची किंमत २ कोटी दाखवण्यात आली. सपचे नेते पवन पांडे यांनी दोन मूळ मालकांची, तसेच दोन खरेदीदारांची नावे पत्रकार परिषदेत उघड केली. या खरेदीदारांनी ही जमीन ५.७ कोटी रुपयांना खरेदी केली. हा जमीन खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर दोन्ही खरेदीदारांनी पुढील १० मिनिटांमध्ये ही जमीन राम जन्मभूमी न्यासाला १८.५ कोटींना विकल्याचा दावाही या नेत्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या