Ayodhya Ram Mandir Cheque Bounce incident : अयोध्येतील राम मंदिरात असंख्य भाविक देणगी देत असतात. धनादेश, ऑनलाईन किंवा रोख स्वरुपात ही देणगी असते. अशावेळी अनेकदा धनादेशाद्वारे दिलेली देणगी प्राप्त होत नाही. धनादेश वटत नसल्याने देणगी मिळत नाही. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राम मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा पुरवण्यासाठी देण्यात आलेला ४ कोटी रुपयांचा धनादेश बँकेत वटला नाही. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचं तपासात समोर आलं असून, या खात्यात फक्त ३ रुपये शिल्लक होते. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

चेन्नई येथील एका महिला भाविकाने हा धनादेश ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला दिला होता. ट्रस्टने हा धनादेश बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचं बँकेच्या निदर्शनास आलं. खात्यात रक्कम नसतानाही इतक्या मोठ्या रकमेचा धनादेश का जारी केला, याचं स्पष्टीकरण मागण्यासाठी बँक आता या महिला भाविकाला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, या महिला भाविकाने मंदिराला वेगळी १० हजार रुपयांची देणगी देखील दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठी अटीची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, या ४ कोटी रुपयांचा वापर केवळ मंदिर कर्मचाऱ्यांच्या सुविधांसाठीच केला जाईल, असं लिखित आश्वासन या महिलेने ट्रस्टकडे मागितलं होतं. मात्र, ट्रस्टने असं कोणतंही लिखित आश्वासन दिलं नाही. सध्या ट्रस्ट या महिलेशी चर्चा करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे.

राम मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांची पार्श्वभूमी

निधी समर्पण अभियान (२०२०): मंदिर उभारणीसाठी राबवण्यात आलेल्या ४५ दिवसांच्या या भव्य मोहिमेत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये जमा झाले होते. या मोहिमेदरम्यान मिळालेल्या धनादेशांपैकी सुमारे १०० कोटी रुपयांचे धनादेश सुरुवातीला तांत्रिक कारणांमुळे बाउन्स झाले होते. त्यानंतर पुन्हा धनादेश जमा करून यातील बहुतांश रक्कम वसूल करण्यात आली, मात्र सुमारे २२ कोटी रुपयांची वसुली अद्याप प्रलंबित आहे.

मासिक देणगी: मंदिराला दरमहा रोख, ऑनलाइन आणि धनादेशांद्वारे सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांची देणगी मिळते. यामध्ये एकट्या धनादेशांद्वारे मिळणाऱ्या देणगीचा वाटा साधारण १ ते १.५ कोटी रुपये आहे. या संपूर्ण प्रकरणावर ट्रस्टने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी जून महिन्यात मंदिरातील देणग्यांची चोरी आणि अफरातफर झाल्याची बाब समोर आली होती, त्यानंतर आता ही नवीन घटना उघडकीस आली आहे.