Ayodhya Ram Mandir donation box theft case investigation: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या रॅकेटचा उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाने (SIT) पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण चोरी प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणजेच मुख्य आरोपी अविनाश शुक्ला असल्याचे एसआयटीच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.
मंदिरात येणाऱ्या दानाची मोजणी करण्यासाठीच ३० वर्षीय अविनाश शुक्लाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याने ‘कुंपणानेच शेत खाण्याचा’ प्रकार केला. अवघ्या ४० दिवसांत त्याने सुमारे ७० वेळा दानपेटीतील पैशांवर डल्ला मारल्याचा संशय आहे. तीन सदस्यीय एसआयटीने आपला ९ पानांचा प्राथमिक अहवाल उत्तर प्रदेशच्या गृह विभागाकडे सुपूर्द केला असून, यामध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
CCTV मुळे फुटले बिंग; ४० दिवसांत ७० वेळा चोरी
मंदिराच्या दान मोजणी कक्षातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मोजणी सुरू असताना अविनाश शुक्ला अत्यंत हुशारीने नोटांचे बंडल आणि सुट्टे पैसे लपवत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या तपासात केवळ सीसीटीव्ही फुटेजच नाही, तर बँक खात्यांचे तपशील, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेली रोकड या भक्कम पुराव्यांच्या आधारे अविनाश शुक्ला हाच या चोरीचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे सिद्ध झाले आहे.
महिन्याचा पगार १५ हजार, घरात मात्र लाखोंची रोकड अन् SUV!
अविनाश शुक्लाच्या घराची आणि मालमत्तेची झडती घेतली असता पोलिसही चक्रावले. अयोध्या पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- रोकड: ₹२०.३९ लाख नगद
- परदेशी चलन: १,१२१ अमेरिकन डॉलर्स (USD)
- दागिने: सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू
- वाहन: एक आलिशान एसयूव्ही (SUV) कार
विशेष म्हणजे, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून दान मोजणीच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व कपाती करून महिन्याला साधारण १५,००० रुपयांपेक्षा थोडे जास्त वेतन मिळते. १५ हजार रुपये पगार असणाऱ्या अविनाशच्या बँक खात्यात आणि घरातून मिळालेली संपत्ती त्याच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा कैक पटीने जास्त आहे.
घरात सापडली ‘रामराज्य कोष’ नावाची बनावट दानपेटी
पोलिस कोठडीत असताना अविनाश शुक्लाच्या मूळ गावी (प्रतापगड जिल्हा) आणि अयोध्येतील निवासस्थानी छापे टाकण्यात आले. यावेळी त्याच्या घरात “रामराज्य कोष” लिहिलेली एक दानपेटी सापडली, ज्यावर एक सक्रिय QR कोड लावलेला होता. या क्युआर कोडचा वापर करून डिजिटल पद्धतीनेही पैसे उकळले जात होते का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
या चोरीत आणखी कोणाकोणाचा हात? ६ जणांवर गुन्हा दाखल
अविनाश शुक्लाने या चोरीच्या गुन्ह्यात आपल्या इतर साथीदारांनाही सामील करून घेतले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचे साथीदार अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे हे पैशांची बंडले लपवण्यास मदत करताना दिसत आहेत, तर मनीष कुमार यादव हा मोजणी कक्षात त्यांच्याशी समन्वय साधत होता. ट्रस्टने दिलेल्या अन्य एका फुटेजमध्ये रमा शंकर मिश्रा हा देखील पैसे लपवताना रंगेहात सापडला आहे.
या प्रकरणी आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे:
१. अविनाश शुक्ला (मुख्य आरोपी)
२. अनुकल्प मिश्रा
३. लवकुश मिश्रा
४. मनीष कुमार यादव
५. करुणेश पांडे
६. रमा शंकर मिश्रा
७. सुभाष श्रीवास्तव
८. रमा शंकर ऊर्फ टिंन्नू
या सर्व आरोपींकडून आतापर्यंत ७९ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर एसआयटीचे बोट; ५ वर्षांचे ऑडिट होणार
या संपूर्ण प्रकरणानंतर राम मंदिराच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एसआयटीने आपल्या अहवालात मंदिराच्या दान व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे:
- मोजणी कक्षात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी अंगझडती घेतली जात नव्हती.
- सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि पर्यवेक्षण अत्यंत कमकुवत होते, ज्यामुळे आरोपींना वारंवार चोरी करण्याची संधी मिळाली.
आता पुढे काय?
एसआयटीने या गंभीर प्रकारानंतर राम मंदिर ट्रस्टच्या गेल्या ५ वर्षांच्या खात्यांचे पुन्हा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांत मंदिरात झालेल्या मोठ्या कार्यक्रमांच्या खर्चाचीही चौकशी केली जात आहे. मोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बड्या अधिकाऱ्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे.
