पीटीआय, अयोध्या

अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी राम मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय, सदस्य अनिल मिश्रा आणि मंदिर अधिकारी गोपाल राव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी वकिलांच्या संघटनेने केली आहे. ‘फैजाबाद बार असोसिएशन’ने गुरुवारी याप्रकरणी एक निषेध मोर्चा काढला आणि पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पहिला एफआयआर ज्यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला, त्या कृष्ण मोहन या अन्य एका विश्वस्तांविरोधातही एफआयआर दाखल करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. ‘फैजाबाद बार असोसिएशन’चे अध्यक्ष कालिका प्रसाद मिश्रा यांनी यासंबंधी माहिती दिली. वकिलांनी तक्रार नोंदवण्यापूर्वी अयोध्या न्यायालयापासून रामजन्मभूमी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. यावेळी वकिलांनी घोषणाबाजी करत एफआयआर नोंदवण्याची आणि न्यासाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात तपास करण्याची मागणी केली. यापूर्वी, याच संघटनेने कोणत्याही आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव केला आहे.

आरोपीच्या पत्नीला बेकायदा बांधकामप्रकरणी नोटीस

या प्रकरणातील एक आरोपी लवकुश मिश्रा याच्या पत्नीला बेकायदा बांधकामप्रकरणी अयोध्या विकास प्राधिकरणाने (एडीए) नोटीस बजावली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ‘एडीए’च्या सूत्रांनी दिलेल्या मागितीनुसार, सोहवाल तालुक्यातील बनवीरपूर गावात या घराचे बांधकाम सुरू असून ती जमीन लवकुश मिश्राची पत्नी सुप्रिया मिश्रा हिच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. ‘एडीए’कडून आवश्यक परवानग्या न घेताच या घराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाची मागणी

नवी दिल्ली : काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास केला जावा अशी मागणी केली. याप्रकरणी शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे हिंदू धर्मीयांची श्रद्धा, धर्म आणि जीवनपद्धतीचा प्रचंड विश्वासघात झाला आहे, असे वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.