अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी अफरातफर प्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’ बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीच्या घटनांमुळे हिंदू धर्माचे स्वयंघोषित रक्षक पूर्णपणे उघडे पडले आहेत.
एका बाजूला भाजपला कठोर ‘एफसीआरए’ नियमांद्वारे नोंदणीकृत ट्रस्टवर नियंत्रण ठेवायचे आहे,तर दुसर्या बाजूला संघासारख्या पूर्णपणे अनिबंधित संस्थांना आपल्या देशातील मंदिरांची लूटमार करण्याची मोकळीक आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या राजीव शुक्ला यांनीही यावर टीका केली.
‘पोचपावतीही मिळाली नाही’ शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या देणगीची पावतीही मिळालेली नाही, असा आरोप पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. या न्यासाला भेट दिलेल्या चांदीच्या विटेचीही पावती देण्यात आली नव्हती, असाही आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ‘‘अपहार केलेल्या पैशांचा वापर खासदार आणि आमदारांना खरेदी करण्यासाठी करण्यात आला,’’ असा आरोप राऊत यांनी केला.
भाजपसाठी अंधकारमय काळ- अखिलेश
भाजपचा बुरखा अखेर फाटला असून प्रभूच्या दैवी शक्तीने आपला चमत्कार दाखवला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली. भाजपचा ‘लंका’ अध्याय थेट अयोध्येतच घडणार आहे. आता भाजपच्या निष्ठावंतांच्या अहंकारावर उभारलेले लंकेचे झगमगते साम्राज्यही नष्ट होईल असे ते म्हणाले.
बाबरी मशिदीसाठी जमा केलेल्या देणग्यांचे काय झाले?’
हा वाद समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा कट असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी केला. बाबरी मशिदीसाठी जमा केलेल्या देणग्यांचे काय झाले, याबद्दल कोणीही प्रश्न का विचारत नाही, असा सवाल त्यांनी केला. सप, काँग्रेस केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
आरोपी कोण?
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ७ जून रोजी राम मंदिर देणगी अफरातफर हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही आरोपींची नावे समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली. त्यानंतर या प्रकरणाने मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आणि या आठ आरोपींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या आरोपींविषयी…
- सुभाषचंद्र श्रीवास्तव : अयोध्या राममंदिराला येणार्या देणग्यांतील रोख रक्कम मोजणार्या कर्मचार्यांचे प्रमुख.
- अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामाशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव : मंदिरात देणगी म्हणून मिळालेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मोजण्याच्या कामात आणि या प्रक्रियेतील विविध भूमिकांत सहभागी.
- रामशंकर यादव ऊर्फ टिन्नू : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे माजी चालक. टिन्नूने रोख रक्कम मोजण्याच्या कामात आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले. माझा मत्सर करणार्या काहींनी मला या प्रकरणात अडकवल्याचे सांगितले.
‘भाजपचे हिंदुत्व बनावट’
संभल : उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देणग्या अपहारप्रकरणी दाखल एफआयआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यात केवळ कनिष्ठ कर्मचार्यांची नावे समाविष्ट असून गैरव्यवहारात जबाबदार असलेल्यांना सोडून देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. ‘‘देणगीच्या चोरीबद्दल काय बोलावे? सुरुवातीपासूनच राम मंदिराबाबत मनमानी निर्णय घेतले गेले आहेत. यात शास्त्रे, वेद किंवा धर्मगुरूंचा सल्ला यांपैकी कशाचेही पालन केले गेले नाही. राजकीय नेत्यांनी निवडलेल्या लोकांच्या मदतीने न्यास स्थापन करण्यात आला, ’’ असे म्हणत भाजपचे हिंदुत्व बनावट असल्याची टीका त्यांनी केली.
