Ayodhya Ram Mandir Donation Scam SIT Investigation Updates: अयोध्या येथील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपांनंतर सध्या एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘विशेष तपास पथक’ (SIT) स्थापन केले असून तपास वेगाने सुरू आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेले ‘यात्रेकरू सुविधा केंद्र’ आहे. याच इमारतीच्या तळघरात राम मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या मोजणीचे गुप्त केंद्र आहे.

सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर, राम मंदिरात दररोज जमा होणाऱ्या देणगीचा हिशोब कसा ठेवला जातो आणि नेमकी कोणती यंत्रणा यासाठी काम करते, याचा सविस्तर तपशील समोर आला आहे.

दररोज लाखो रुपयांचे दान; २ सत्रांमध्ये (शिफ्ट्स) होते मोजणी!

राम मंदिर परिसरात सध्या सुमारे ३५ दानपेट्या बसवण्यात आल्या आहेत. मंदिरात दररोज सरासरी एक लाख भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “दानपेट्यांमध्ये दररोज सरासरी ८ ते १३ लाख रुपये जमा होतात. मात्र, सण-उत्सव किंवा विशेष दिवसांमध्ये हा आकडा थेट ५० ते ६० लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.”

एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या रोकड आणि दागिन्यांची मोजणी करण्यासाठी विशेष व्यवस्था

दोन सत्रांमध्ये काम: पैशांची मोजणी दररोज दोन शिफ्ट्समध्ये चालते. पहिली शिफ्ट सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ ते रात्री ८ अशी असते.

कर्मचाऱ्यांची फौज: प्रत्येक शिफ्टमध्ये सुमारे २० बँक कर्मचारी आणि मोजणीदार तैनात असतात.

कडक नियम: शिफ्ट सुरू असताना कर्मचाऱ्यांना केवळ जेवण आणि स्वच्छतागृहासाठी बाहेर पडण्याची परवानगी असते. शिफ्ट संपल्याशिवाय कोणालाही इमारत सोडता येत नाही.

अयोध्या येथील भव्य राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये फेरफार झाल्याच्या आरोपांनंतर सध्या एकच खळबळ उडाली आहे..

दागिने बदलल्याचा गंभीर आरोप; SIT कडून कसून चौकशी सुरु…

भाविकांनी रामलल्लाच्या चरणी अर्पण केलेले सोने, चांदी आणि हिऱ्यांचे खरे दागिने काढून त्याऐवजी बनावट दागिने ठेवण्यात आल्याचा आणि रोख रकमेची चोरी झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने ३ सदस्यांची ‘एसआयटी’ (SIT) नियुक्त केली आहे.

हे पथक सध्या मंदिराच्या जवळील ‘ग्रीन हाऊस’ येथे तळ ठोकून असून, सर्व आर्थिक रेकॉर्ड, पुस्तक नोंदी आणि देणगी मोजणी प्रक्रियेची कसून तपासणी करत आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल पुढील एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या सर्व वादाच्या गडबडीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील अयोध्या दौऱ्यावर येत असून, ते मंदिर प्रशासनाची बैठक घेणार आहेत.

मोजणीच्या चाव्या कोणाकडे? ‘अशी’ चालते प्रक्रिया

राम मंदिरातील देणगी प्रक्रियेचे मुख्य नियंत्रण ट्रस्टचे वरिष्ठ सदस्य अनिल मिश्रा यांच्याकडे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त बँक अधिकारी सुभाष श्रीवास्तव थेट मोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवतात.

दानपेट्या रिकाम्या करणे: दानपेटी भरल्यानंतर ती उघडताना ट्रस्टचे कर्मचारी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अधिकारी मिळून किमान ४ व्यक्ती उपस्थित असणे अनिवार्य आहे.

सुरक्षित वाहतूक: दानपेट्यांमधील रक्कम मोठ्या लोखंडी ट्रंकांमध्ये भरून, सीलबंद करून सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या कडक पाळतीखाली मोजणी कक्षात आणली जाते.

वर्गीकरण आणि बँकिंग: मोजणी कक्षात नोटा, नाणी आणि दागिने वेगळे केले जातात. मोजणी पूर्ण झाल्यावर ही रक्कम पुन्हा सीलबंद करून दररोज सकाळी ‘एसबीआय’च्या (SBI) शाखेत जमा केली जाते.

डिजिटल व्यवहारांवर भर: एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रस्टचे मुख्य खाते हे ‘नो-चेक बुक’ खाते आहे. मंदिरात येणारा सर्व खर्च, कंत्राटदारांचे पेमेंट्स किंवा इतर खरेदी केवळ डिजिटल माध्यमातून केली जाते, जेणेकरून पारदर्शकता राहील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अस्वस्थता; विरोधक आक्रमक

या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांच्या अंतर्गत वर्तुळात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, “अशा संशयास्पद लोकांना ट्रस्टमध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तातडीने पदावरून हटवावे,” अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणाला ‘अत्यंत लाजीरवाणा प्रकार’ म्हटले आहे, तर काँग्रेसने भाजपवर ‘आस्थेचा बाजार’ मांडल्याची टीका केली आहे.

इतर प्रसिद्ध मंदिरांमध्ये कशी असते व्यवस्था?

अयोध्या मंदिरातील या वादानंतर देशातील इतर मोठ्या मंदिरांमधील सुरक्षा व्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे.

काशी विश्वनाथ मंदिर (वाराणसी): येथील एका ट्रस्टींनी सांगितले की, “आमच्याकडे ५० दानपेट्या आहेत. दर मंगळवारी आणि शुक्रवारी खुल्या व्हरांड्यात, सरकारी प्रतिनिधी आणि बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण पारदर्शकपणे आणि थेट कॅमेऱ्यासमोर महिला भाविकांकडून ही मोजणी केली जाते. तिथे आजवर असा कोणताही वाद झालेला नाही.”

विंध्याचल मंदिर: येथेही सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोजणी होते. २०१६ मध्ये एका कर्मचाऱ्याला कॅमेऱ्यावर चोरी करताना पकडण्यात आले होते आणि त्याच्यावर तातडीने एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता.