अयोध्या येथील भव्य राम मंदिरात येणाऱ्या दानावर डल्ला मारणाऱ्या आरोपींनी अवघ्या काही महिन्यांतच आपले नशीब बदलून घेतल्याचे विशेष तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे. कधीकाळी पिण्याचे पाणी विकणारे आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारे हे आरोपी आज आलिशान घरे आणि SUV गाड्यांमधून फिरत आहेत. मंदिरात दररोज तब्बल ६ ते ८ लाख रुपयांची चोरी केली जात असल्याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पाणी विकणारा झाला कारचा मालक; चौकशीत धक्कादायक खुलासे
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश शुक्ला नावाचा मुख्य आरोपी आधी हनुमान गुहेजवळ पिण्याचे पाणी विकायचा. नंतर त्याला राम मंदिर दान मोजणी केंद्रात नोकरी मिळाली. मूळचा प्रतापगडचा असलेल्या अविनाशने अवघ्या काही दिवसांत अयोध्येत स्वतःचे घर बांधले आणि नुकतीच पोलिसांनी त्याची ‘ब्रेझा’ कार जप्त केली आहे. याबाबतचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
दुसरा आरोपी लवकुश मिश्रा याने ८ लाख ८० हजार रुपयात सोहावल भागात १ हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट खरेदी केला, ज्याचा खरा बाजारभाव २५ लाख रुपये आहे. तर रामशंकर यादव उर्फ ‘टिन्नू’ याने थेट एक हॉस्टेलच उभारले आहे. महिना अवघे १४ ते १५ हजार रुपये कमवणाऱ्या या कर्मचाऱ्यांची ही आलिशान जीवनशैली पाहून पोलीस चक्रावले आहेत.
मोज्यांत आणि खिशात लपवायचे पैसे
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ५ आरोपी संशयास्पदरीत्या पैसे लपवताना कैद झाले आहेत. पैशांची मोजणी करताना ते पैसे खिसे आणि मोज्यांमध्ये लपवायचे. त्यानंतर ते पैसे तात्पुरते मंदिराच्या बाथरूममध्ये ठेवले जायचे आणि नंतर हळूहळू बाहेर काढले जायचे. नियमानुसार मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणे बंधनकारक होते, मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
महाकुंभ दरम्यान सर्वाधिक लूट
२०२५ मधील महाकुंभ काळात १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. दररोज १० ते १२ लाख लोक दर्शनाला येत होते. या प्रचंड गर्दीमुळे दान मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सीमार्फत ४० ते ४५ नवीन कर्मचारी ठेवण्यात आले, ज्यांची शिफारस ट्रस्टच्याच काही सदस्यांनी केली होती. याच काळात सर्वाधिक चोरी झाल्याचा संशय आहे. आधी मंदिरात रोज १६ ते १८ लाख रुपये बँकेत जमा व्हायचे, पण चोरी पकडली गेल्यावर हा आकडा रोज २४ ते २६ लाखांवर पोहोचला आहे.
बदनामीच्या भीतीने गुन्हा नोंदवण्यास उशीर?
विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटीच ही चोरी पकडली गेली होती. काही आरोपींकडून पैसेही वसूल करण्यात आले होते. मात्र, राम मंदिराची बदनामी होईल या भीतीने सुरुवातीला कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नाही. आता पोलीस केवळ रोख रक्कमच नाही, तर भाविकांनी दान केलेल्या सोन्या-जांदीच्या दागिन्यांच्या हिशोबाचीही चौकशी करत आहेत.
