Ayodhya Ram Mandir Donation Theft, Accused Avinash Shukla Girlfriend Gifts: अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानावर काही जणांनी डल्ला मारल्यामुळे देशभरात खळबळ उडाली. विशेषतपास पथकाच्या तपासानंतर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अविनाश शुक्ला नावाच्या आरोपीने पोलीस तपासात प्रेयसीला लाखो रुपयांचे गिफ्ट दिले असल्याचे सांगितले. पोलीस त्याच्या बँक खात्याची चौकशी करत आहेत. त्याने प्रेयसीला आयफोन भेट दिल्याचेही मान्य केले. एनडीटीव्हीने या संदर्भातील बातमी दिली आहे.
पत्नीच्या नावावर घर, प्रेयसीला महागडे गिफ्ट
अविनाश शुक्ला हा राम मंदिरात नोकरीला लागण्यापूर्वी हनुमान गुहेजवळ पिण्याचे पाणी विकायचा. नंतर त्याला राम मंदिर दान मोजणी केंद्रात नोकरी मिळाली. मूळचा प्रतापगडचा रहिवासी असलेल्या अविनाशने अवघ्या काही दिवसांत पत्नीच्या नावावर प्लॉट घेऊन स्वतःचे घर बांधले. तसेच त्याने महागडी कारही विकत घेतली. नुकतीच पोलिसांनी त्याची ‘ब्रेझा’ कार जप्त केली आहे.
पोलीस अविनाशच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराची चौकशी करत आहेत. त्याने आपल्या बँक खात्यातून प्रेयसीच्या खात्यात दोन लाख रुपये हस्तांतरित केले होते. तसेच त्याने प्रेयसीला महागडा आयफोनही भेट दिला होता.

राम जन्मभूमी मंदिरात दानाची रक्कम मोजण्यासाठी कंत्राटी स्वरुपात कामावर असलेल्या अविनाश शुक्लाचे वेतन दरमहा अवघे १५ हजार रुपये होते. त्याच्याजवळ इतका पैसा कुठून आला, याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची चौकशी केली. कोणत्या मार्गाने त्याच्या खात्यात पैसे आले आणि ते कुठे कुठे खर्च करण्यात आले, याचा तपास केला जात आहे. हे पैसे दानातील रकमेतून चोरले आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अविनाशचा भाऊ अभिषेकने म्हटले की, अविनाश मंदिरातील ड्युटी संपल्यानंतर पैसे घेऊन योग केंद्रात जाताना दिसायचा. त्याला याबाबत विचारले असता त्याने स्पष्ट उत्तर दिले नाही. यानंतर दुसरा आरोपी अनुकल्प मिश्राशी याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने सांगितले की, मंदिरात भाविकांचे दर्शन झाल्यावर ते स्वखुशीने पैसे भेट म्हणून देतात.
राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणाची चौकशी सध्या विशेष तपास पथकाकडून करण्यात येत आहे. याचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. शनिवारी पोलिसांनी त्याची महागडी गाडी जप्त केली. अविनाशने कबूल केले की, चोरीच्या रकमेतून त्याने भावाच्या नावावर ही कार घेतली होती. मंदिरातून चोरी केलेल्या पैशांची आरोपी विभागणी करून घेत होते, हेदेखील त्याने मान्य केले.
