अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीच्या १०५ घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सोमवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत असून, या तपासातून ही माहिती समोर आली आहे. एसआयटी तपासातून समोर आलेली माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. एसआयटी तपास अंतिम टप्प्यात असून, २५ सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही मेहतांनी न्यायालयास सांगितले.

न्यायालयात सुनावणी

राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने आज एसआयटीच्या तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल तपासला. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आणि गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांची माहिती देखील न्यायालयाला देण्यात आली. उपलब्ध पुरावे देखील यावेळी न्यायालयात सादर करण्यात आले. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांच्या जबान्या आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज, इतर पुरावे सादर

एसआयटीने सादर केलेल्या अहवालात सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध कसा घेतला? याची माहिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व माहिती रेकॉर्डवर घेतल्याचे समोर आले आहे. सॉप्टवेअरच्या मदतीने किंमती वस्तूंच्या पोहोचपावत्या तयार करण्यात आल्या असून, वस्तू स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या आहवालात १०५ देणगी चोरीच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही म्हटले आहे. याचिकार्त्यांनी एसआयटी अहवालाची प्रत देण्याची विनंती केली पण, न्यायालयाने विनंती फेटाळली.

सीईओंची नियुक्ती

सत्र न्यायालयाकडून हे प्रकरण काढून घेण्याचा मानस नसल्याचेही सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. तसेच, पुढे तपासाची गरज भासल्यास आवश्यक आदेश दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. देणगी गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे वरिष्ठ पदाधिकारी चंपत राय आणि अनिक मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवे प्रशासन मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. माजी लष्कर अधिकारी जितेंद्र मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

आठ जणांना अटक

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यापूर्वी, ट्रस्टच्या विनंतीवरून राज्य सरकारने १३ जून रोजी लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. या पथकाने २३ जून रोजी प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर करुन काही सूचनाही केल्या होत्या. या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये एकूण आठ संशयितांची नावे आहेत, सर्वांना अटक करण्यात आली आहे.