Ayodhya Ram Temple Event Updates : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. याद्वारे सांस्कृतिक उत्सवाचा आणि राष्ट्रीय एकतेचा नवा अध्याय सुरू होत आहे, अशी टिप्पणी देखील केली. जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरामधील श्री रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. मात्र, तेव्हा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. अपूर्ण राहिलेलं बांधकाम गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळे आज मोदी यांनी औपचारिकरित्या मंदिरावर ध्वजारोहण केलं.
Ram Temple Event Ayodhya Live Updates : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरावर ध्वजारोहण केलं.
"राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल", ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज या ध्वजारोहणानंतर आपला अनेक वर्षांचा यज्ञ पूर्ण झाल्याची भावना उफाळून आली आहे. आज सगळं जय राममय झालं आहे. भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज, एक साधारण ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या ध्वजातला भगवा रंग, यामधील सूर्यवंशाची ख्याती, ओम शब्द, यावर रेखाटलेला कोविदार वृक्ष या सगळ्यातून राम राज्याची किर्ती प्रतिरुपित होत आहे. हा ध्वज संकल्प व यशाचा आहे. ही संघर्षातून सृजणाची गाथा आहे. ही संतांची साधना आहे. येणारा काळ श्रीरामाच्या आदर्श सिद्धांतांचा उद्घोष करेल. 'सत्यमेव जयते'चं आवाहन करेल. सत्याचा नेहमी विजय होतो हेच जगाला सांगेल. सत्य हेच धर्माचं स्वरुप आहे असा संदेश हा ध्वज जगाला देईल."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत म्हणाले, "५०० वर्षे संघर्ष आणि आता ३० वर्षांच्या लढाईनंतर अयोध्येत आपण राम मंदिर बांधलं. आज त्या मंदिराची शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली. मंदिरावर ध्वजारोहण झालं. हा त्या रामराज्याचा ध्वज आहे. एके काळी हाच ध्वज अयोध्येत फडकत होता. संपूर्ण विश्वात सुख व शांती प्रदान करत होता. तो ध्वज आज पुन्हा एकदा खालून वर गेला आणि शिखरावर जाऊन आरोहित झाला. हा क्षण आम्ही याची देही याची डोळा पाहिला."
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्री राम मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आलं.
राम दरबारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रामलल्लांची आरती केली. थोड्याच वेळात मोदी मंदिरावर ध्वजारोहण करणार.
अयोध्येतील दळणवळण सुविधेचा कायापालट
Ram Temple Flag Hoisting LIVE : ध्वजारोहणाआधी पंतप्रधान मोदींकरवी सप्तमंदिरात पूजा
पंतप्रधान मोदी तासाभरापूर्वी अयोध्येत दाखल झाले. ते हेलिकॉप्टरने महर्षी वाल्मिकी विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विमानतळ ते राम मंदिर या रस्त्यावर रोड शो केला. मंदिरात दाखल होताच त्यांनी सप्तमंदिरात पूजा केली. आता ते राम मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर ते शिखरावर धर्म ध्वज फडकावतील.
'असं' आहे राम मंदिर
उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर हा ध्वज फडकवला जाईल. तर, दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेनुसार संरचना असलेले मंदिराभोवती बांधलेले ८०० मीटरचे परकोटा, मंदिराच्या स्थापत्य विविधतेचे दर्शन घडवते. मंदिर संकुलात मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित रामाच्या जीवनातील ८७ प्रसंग कोरलेले आहेत.
