Ram Mandir Donation Controversy : अयोध्येतील श्रीराम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये अपहार झाल्याच्या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच एसआयटीचा अहवाल समोर आला असून या अहवालातून मोठी माहिती समोर आली आहे.

या देणग्यांमधील अपहार प्रकरणात ८ जणांवर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एसआयटीच्या प्राथमिक अहवालात देणगी व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर या घडामोडी घडल्या आहेत.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर देणग्यांमधील अपहार प्रकरणात वेगवेगळे आरोप केले जात आहेत. देणग्यांमधील फक्त निधीचा अपहार नाही, तर राम मंदिराला मिळालेल्या चांदीच्या पट्ट्या आणि विटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, २०० किलो वजनाच्या चांदीच्या विटा व पट्ट्या चोरीला गेल्याच्या चर्चा एसआयटीने फेटाळून लावल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचा राजीनामा

अयोध्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिकेनंतर ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’मध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

SIT च्या अहवालानंतर कारवाई

राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या हाताळणीत आणि देखरेखीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाल्याचं ‘एसआयटी’च्या प्राथमिक चौकशीत उघड झालं होतं. हा अहवाल समोर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्‍यांच्या आदेशानंतर अखेर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, क्राईम ब्रँच आणि विशेष तपास पथकाने गुरुवारी या प्रकरणात काही जणांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या अटकेच्या अवघ्या २४ तासांच्या आत ट्रस्टच्या दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.