Ayodhya Ram Mandir Total Cost : अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. या मंदिरातील रामलल्लांची मूर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज एनडीटीव्हीला म्हणाले, “हा खूप महान दिवस आहे. ५०० वर्षांपासूनची लोकांची प्रतीक्षा आज संपली.”

अनेक दशकं न्यायालयीन लढाई लढल्यानंतर हे मंदिर आज उभं राहिलं आहे. या मंदिरासाठी जगभरातील रामभक्तांनी स्वेच्छेने तीन हजार कोटी रुपयांची देणगी दिलीआहे, ज्यातून हे मंदिर उभं राहिलं. यासह हा इतिहासातील सर्वात मोठा क्राउड-फंडेड धार्मिक प्रकल्प आहे.

दरम्यान, या मंदिराच्या उभारणीसाठी किती खर्च झाला असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बांधकाम समितीचे प्रमुख व पंतप्रधान कार्यालयाचे माजी सचिव नृपेंद्र मिश्र यांनी ताज्या लेखापरिक्षा अहवालातील आकडेवारी हिंदुस्तान टाइम्सबरोबर शेअर केली आहे.

Ram Mandir
राम मंदिर (PC : X/@ShriRamTeerth)

मंदिर बांधण्यासाठी किती खर्च झाला?

श्रीराम मंदिर ट्रस्टकडे प्राप्त झालेल्या देणग्या : ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त

कंत्राटदार, कामगार, साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांना दिलेली रक्कम : अंदाजे १,५०० कोटी रुपये

संपूर्ण प्रकल्पाचा (मंदिर + ७० एकर संकुल) अंदाजे खर्च : १,८०० कोटी रुपये.

ram Mandir
राम मंदिर (PC : X/@ShriRamTeerth)

उर्वरित कामे (भाविकांसाठीच्या सुविधा, संकुलातील इतर लहान मंदिरं) : उपलब्ध निधीतून उर्वरित कामं दोन महिन्यांमध्ये पूर्ण केली जातील.

या मंदिरासाठी सुरुवातीला ११०० ते १४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, महागाई व विस्तारीत कामांमुळे हा खर्च १८०० कोटी रुपयांपर्यंत वाढला.

मार्च २०२५ पर्यंत एकूण पाच वर्षांमध्ये ट्रस्टने मंदिराच्या कामासाठी २१५० कोटी रुपये खर्च केले. त्यापैकी १८५० कोटी रुपये ऑगस्ट २०२४ पर्यंत खर्च केले होते.

Ram Mandir
राम मंदिर (PC : X/@ShriRamTeerth)

निधी कसा गोळा झाला?

जानेवारी २०२१ पर्यंत निधी संकलन मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या ४४ दिवसांमध्ये १० कोटी भाविकांनी पावत्यांद्वारे देणग्या दिल्या. १० ते १००० रुपयांच्या देणग्यांद्वारे तब्बल २,१०० ते २,५०० कोटी रुपये जमा झाले. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र किंवा राज्य सरकारचा एकही रुपया वापरलेला नाही. ट्रस्टने ही गोष्ट वारंवार सांगितली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने २०१९ च्या निकालाद्वारे यास दुजोरा दिला होता.

४१ दिवसांच्या जनसंपर्क मोहिमेद्वारे १.५ लाख स्वयंसेवकांनी शेकडो लहान मोठ्या बँकांच्या ३५,००० शाखा व डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा निधी गोळा करण्यात आला. यावेळी रस्त्यावरील चहावाल्यासह लहान विक्रेत्याने दिलेल्या पाच रुपयांच्या देणगीसाठी त्याला पावती दिली गेली.

ram mandir
राम मंदिर (PC : X/@ShriRamTeerth)

अनिवासी भारतीय व जगभरात पसरलेल्या राम भक्तांनी देखील मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत. युनायटेड किंगडम, अमेरिका, कॅनडा, फिजी, मॉरिशस, त्रिनिदाद व टोबॅगोहून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतरही देणग्यांचा ओघ

२२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून मंदिरातील दानपेट्या भरून वाहत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातूनही देणग्या स्वीकारल्या जात आहेत. ट्र्स्टने दिलेल्या माहितीनुसार दररोज सरासरी ६० ते ८० लाख रुपये रोख व वस्तूंच्या स्वरुपात मिळत आहेत.

ram mandir
राम मंदिर (PC : X/@ShriRamTeerth)

पैसे कुठे खर्च झाले?

श्री रामजन्मभूमी ट्रस्ट दरवर्षी लेखापरिक्षा अहवाल प्रसिद्ध करते. त्यानुसार राजस्थानमधून दगड मागवण्यात आले. यामध्ये मकराना संगमरवर, बान्सिपहाडपूरहून गुलाबी दगड मागवण्यात आले. हे दगड आणण्यासह त्यांची वाहतूक व त्यावरील शिल्पकाम, कोरीव कामावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च झाले.

मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून उच्च दर्जाचं सागवान लाकूड मागवण्यात आलं.

१२०० कुशल शिल्पकार व ३५०० मजूर दररोज मंदिर उभारणीसाठी काम करत आहेत.

२.८ लाख घनफूट कोरलेला दगड (लोखंड किंवा कुठलाही धातू न वापरता पारंपरिक तंत्राने कोरीवकाम) मंदिरासाठी वापरण्यात आला आहे.

मंदिराच्या शिखरासह कळस बनवण्यासाठी २१ टन तांबे, १०० टन पितळ वापरण्यात आलं आहे. कळस व दरवाजे बनवण्यासाठी सोन्याचाही वापर करण्यात आला आहे. मंदिराला एकूण १२ दरवाजे आहेत.