अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणग्यांच्या अपहार प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा होत आहे. श्रीराम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या जाणार्‍या देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचा कथित अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी आठ जणांना अटक केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

अयोध्येतील राम मंदिर देणगी कथित अपहार प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडी सुरू असताना श्रीराम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या गेलेल्या २०० किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली होती.

या आरोपांवर आणि देणग्यांच्या अपहार प्रकरणावर आता पहिल्यांदाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अधिकृत एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शनिवारी एका निवेदनात म्हटलं की, भाविकांनी दान केलेले सर्व दागिने, चांदीच्या विटा आणि इतर वस्तू सुरक्षित आहेत. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.

ट्रस्टने निवेदनाद्वारे काय म्हटलं?

श्रीराम मंदिरात देणग्यांची कथित चोरी झाल्याच्या प्रकरणावर ट्रस्टने एक निवेदन जारी करत म्हटलं की, “श्री राम मंदिरासंदर्भात गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या घटनांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत. मात्र, भविष्यात अशी दुर्दैवी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन देत आहोत.”

चांदीच्या विटा आणि दागिने सुरक्षित असल्याचा खुलासा

“ज्या भाविकांनी भगवान श्रीरामांच्या सेवेसाठी अर्पण करण्याकरिता चांदीच्या विटा, दागिने इत्यादी वस्तू सुपूर्द केल्या होत्या. त्यांना आम्ही खात्री देतो की या वस्तूंची सुरक्षितपणे नोंद ठेवण्यात आली असून त्या उपलब्ध आहेत. मंदिराच्या दानपेट्यांमधून जमा झालेल्या निधीशी संबंधित घटनेबाबत, ट्रस्टच्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने सादर केलेल्या अंतरिम अहवालाच्या आधारे ट्रस्टने एफआयआर दाखल केला. या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे”, असं स्पष्टीकरण ट्रस्टने दिलं.

चंपत राय, अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांची पुष्टी

सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचे राजीनामे मिळाल्याची पुष्टी ट्रस्टने केली. “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचे राजीनामे प्राप्त झाले आहेत. ट्रस्ट आपल्या पुढील बैठकीत यावर पुढील कार्यवाही करेल”, असं ट्रस्टने निवेदनात म्हटलं.

SIT च्या अहवालानंतर कारवाई

राम मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या हाताळणीत आणि देखरेखीत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाल्याचं ‘एसआयटी’च्या प्राथमिक चौकशीत उघड झालं होतं. हा अहवाल समोर येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्‍यांच्या आदेशानंतर अखेर चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, क्राईम ब्रँच आणि विशेष तपास पथकाने गुरुवारी या प्रकरणात ८ जणांना अटक करत मोठी कारवाई केली. या अटकेच्या अवघ्या २४ तासांच्या आत ट्रस्टच्या दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.