Ram Temple Donation Theft probe links massive pilferage to Maha Kumbh rush : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणी तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला किरकोळ चोऱ्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, मात्र गेल्या वर्षी महाकुंभादरम्यान जेव्हा भाविकांची गर्दी आणि दान प्रचंड वाढलं, तेव्हा हा अपहार अधिक संघटित पद्धतीने सुरू झाला. याच काळात पैसे मोजण्याच्या प्रक्रियेत अतिरिक्त लोकांचा समावेश करण्यात आला होता, अशी माहिती मंदिर प्रशासन आणि पोलिसांमधील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिली आहे.
महाकुंभच्या वेळी दिवसाला १० लाख भाविकांचं दर्शन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीच्या दिवसांत मंदिरातील भाविकांची सरासरी संख्या ८४ हजार ते १ लाख दरम्यान असते. मात्र, १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू होऊन २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या ४५ दिवसांच्या महाकुंभ उत्सवावेळी, १० ते १२ लाख भाविक दिवसाला दर्शन घेत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाला मदत करण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांच्या शिफारशीवरून पैसे मोजण्याच्या कामात अतिरिक्त कर्मचारी वाढवण्यात आले होते, असंही सूत्रांनी सांगितलं.
महाकुंभ मेळाव्यात दान प्रचंड वाढलं
नाव न सांगण्याच्या अटीवर मंदिरातील एका अधिकाऱ्याने सांगितलं, “२०२४ मधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सुरुवातीला भाविकांचा मोठा ओघ आला. मात्र, महाकुंभाच्या काळात भाविकांची संख्या कमालीची वाढली आणि त्यासोबतच दानही प्रचंड वाढलं. पैसे मोजण्यासाठी अधिक मदतीची गरज होती आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. परंतु, ही नोकरभरती एका कंपनीमार्फत थेट एसबीआयसाठी करण्यात आली होती. सर्व काही विश्वास आणि श्रद्धेवर चाललं होतं. ही गोष्ट इतक्या संघटित पद्धतीने घडेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.”
कंपनीमार्फत एसबीआयसाठी नियुक्ती
दान केलेल्या पैशांची मोजणी आणि ते बँकेच्या शाखेत पाठवण्याची व्यवस्था सांभाळण्यासाठी एसबीआयने सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेसची नियुक्ती केली होती. गुरुवारी, सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेसचे संचालक गौरव सिंग म्हणाले की, त्यांची एजन्सी बँका आणि इतर कंपन्यांना हाऊसकीपिंग (स्वच्छता व देखभाल) कर्मचारी पुरवते. “आम्ही बँकिंगशी संबंधित कुशल मनुष्यबळ पुरवत नाही, तर हाऊसकीपिंग कर्मचारी पुरवतो. बँक किंवा कंपनी त्या कर्मचाऱ्यांकडून काय काम करून घेते, हा त्यांचा प्रश्न आहे. राम मंदिरातील भरती प्रक्रियेत त्यांच्या एजन्सीला स्वतःहून माणसे निवडण्याचे स्वातंत्र्य नव्हते”, असं सिंग यांनी सांगितलं.
“या प्रकरणात, एसबीआयनेच आम्हाला भरती करायच्या लोकांची नावे दिली होती. आम्ही फक्त त्यांच्या आधार कार्डांची तपासणी करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली. या व्यक्तींनी यापूर्वी कधीही आमच्यासोबत काम केले नव्हतं” असं सांगत सिंग यांनी सांगितलं की, या संदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावे प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) सुपूर्द करण्यात आले आहेत.
याआधीही अनेकवेळा अपहार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया आणि पैशांच्या कथित अपहारावरून ट्रस्टशी संबंधित दोन सदस्यांमधील अंतर्गत वादामुळे हे प्रकरण जाहीर झालं. एका पोलीस अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं, “हा अपहार मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं गेलं होतं; मात्र अलीकडेच लागोपाठ घडलेल्या काही घटनांमुळे हे प्रकरण एकामागून एक उघडकीस आलं.”
सूत्रांनी सांगितलं की, सुरुवातीला संशयितांना चोरीचे पैसे पुन्हा खात्यात जमा करण्यास सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसंच, तेथे दोन सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष होते. त्यातील एक पोलिसांच्या देखरेखीखाली होता, तर दुसरा पैसे मोजण्याच्या केंद्रावर होता, जिथे ट्रस्टचे अधिकारी आणि पोलीस तैनात होते. तपास अधिकारी आता पोलीस आणि एसबीआय अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करत आहेत. असा संघटित अपहार केवळ एका पातळीवर शक्य नाही, असं अधिकाऱ्यांचं मत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंदिरात मोठा सुरक्षा बंदोबस्त होता. पीएसीच्या (PAC) ८ कंपन्या, ५०० सीआरपीएफ (CRPF) जवान, उत्तर प्रदेश पोलीस विशेष सुरक्षा दलाचे ७५० जवान आणि नागरी पोलीस तैनात होते. याशिवाय, ट्रस्टने खाजगी सुरक्षा रक्षकही नेमले होते, जे पैसे मोजण्याच्या खोलीबाहेर तैनात होते. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, “खोलीत हाताळल्या जाणाऱ्या रोख रकमेचे अफाट प्रमाण पाहता, सुरक्षा तपासणी नक्कीच अपुरी होती.”
पोलिसांनी यापूर्वी सांगितलं होते की, अटक करण्यात आलेल्या आठपैकी सात आरोपींकडून सुमारे ८० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच वेगवेगळ्या मूल्यांचे परदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, २५ जून रोजी एफआयआर (FIR) दाखल झाल्यापासून मंदिरातील भाविकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, २७ जून रोजी अंदाजे ९७ हजार १३४, २८ जून रोजी १ लाख ०२ हजार ६७२ आणि २९ जून रोजी ८४ हजार १०२ भाविकांनी भेट दिली. यानंतर ३० जून रोजी ९६ हजार ११२ आणि १ जुलै रोजी ही संख्या ८९ हजार ६५३ होती.
