Ayodhya verdict : रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्त्व मान्य – सर्वोच्च न्यायालय

Ram Mandir-Babri Masjid Case Supreme Court Verdict : देशभरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

(संग्रहित छायाचित्र)

Ram Mandir-Babri Masjid Case Supreme Court Verdict : राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला.

न्यायालायाच्या या निर्णयानंतर संयम आणि शांतता बाळगण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींसह विविध राजकीय नेत्यांनी केलं. निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. कोठेही गालबोट लावणारी अनुचित घटना घडली नाही. देशभरात जनजीवन सामान्य होतं.

Live Blog

16:35 (IST)09 Nov 2019
एक अध्याय संपला, नवं पर्व सुरू होत आहे -उद्धव ठाकरे

अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा आजचा दिवस आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला आहे. आता पुन्हा अयोध्येत जाणार आहे. एक अध्याय संपला आहे. तरी एक नवं पर्व सुरू होत आहे,” असं ठाकरे म्हणाले.

15:03 (IST)09 Nov 2019
राम मंदिरात जाण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय रद्द

१४४ कलम म्हणजेच जमावबंदी लागू असल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडाळ्याच्या राम मंदिरात जाण्याचा निर्णय रद्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नियोजित वेळापत्रकानुसार दुपारी ३ वाजता वडाळा येथील राम मंदिरात पुजा आणि आरतीसाठी जाणार होते. पण जमावबंदी लागू असल्याने त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला आहे.

14:22 (IST)09 Nov 2019
ही लढाई हक्कासाठी, पाच एकर भीक नको : असदुद्दीन ओवेसी

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीची भीक नको,’ असं भूमिका ओवेसी यांनी मांडली आहे.


13:42 (IST)09 Nov 2019
हा वाद निकाली काढण्यासाठी निर्णयाचा उपयोग होईल : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले, “निकालाचा सर्वांनी आदर करायला हवा. हा वाद निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचा उपयोग होईल. त्यामुळे शांतता आणि संयम बाळगावा,” असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

13:21 (IST)09 Nov 2019
न्याय देणाऱ्या निर्णयाच स्वागत – मोहन भागवत

बहुप्रतिक्षित असलेल्या राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर निकाल दिला. वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन, मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल, असं घटनापीठानं सांगितलं. न्यायालयाच्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे. “न्याय देणाऱ्या निर्णयाचं स्वागत. या दीर्घकालीन प्रक्रियेत बलिदान दिलेल्याचं स्मरण करतो. भूतकाळात घडलेलं विसरून पुन्हा एकत्र येऊ,” असं भागवत म्हणाले.

12:28 (IST)09 Nov 2019
मंदिराची दारे उघडल्यानं भाजपाच्या राजकारणाची दारे बंद झाली : काँग्रेस

सर्वोच्च न्यायालयानं राम जन्मभूमी वादात दिलेल्या निकालावर काँग्रेसनं निकालाचं स्वागत केलं. सामाजिक सौहार्दता कायम ठेवण्याचं आवाहन करत काँग्रेसनं भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूनं आहोत. या निर्णयानं फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

12:14 (IST)09 Nov 2019
सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्याचा आनंद : इक्बाल अन्सारी

अयोध्येतील वादग्रस्त जागेवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर शनिवारी निकाल दिला. केंद्र सरकारने वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा. तसेच मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय न्यायालयानं दिला. न्यायालयाच्या निर्णयावर या खटल्यातील फिर्यादी असलेल्या इक्बाल अन्सारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आनंदी आहे की, सर्वोच्च न्यायालयानं अखरे निकाल दिला. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा मला आदर आहे.

11:55 (IST)09 Nov 2019
निर्णय स्वीकारून शांतता राखावी -नितीन गडकरी

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा आणि शांतता राखावी, गडकरी यांनी म्हटलं आहे.

11:13 (IST)09 Nov 2019
वादग्रस्त जागा हिंदुंना, मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टानं जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. केंद्र सरकारनं तीन महिन्यात योजना तयार करेल. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

11:07 (IST)09 Nov 2019
१८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण नाही

वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

11:00 (IST)09 Nov 2019
मुंबईत कलम १४४ लागू

राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निकाल येण्यास सुरूवात झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उद्या (१० नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत लागू असणार आहे.

10:56 (IST)09 Nov 2019
श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब

प्रभू रामाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, अशी हिंदूची श्रद्धा आहे. तर मुस्लीम याला बाबरी मशिद मानतात. श्रद्धा ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असं न्यायालायनं म्हटलं आहे.

10:51 (IST)09 Nov 2019
रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्त्व मान्य

निर्मोही आखाड्याची याचिकाही फेटाळली. निर्मोही आखाडा सेवक असल्याच न्यायालयाकडून अमान्य. मात्र, रामलल्लाचे कायदेशीर अस्तित्त्व न्यायालयानं मान्य असल्याचं म्हटलं. रामजन्मभूमी व्यक्ती नाही, पण भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालाकडं दुर्लक्ष करता येणार नाही. बाबरी मशिद रिकाम्या जागी बांधली गेली नाही. गाडल्या गेलेल्या अवशेषांमध्ये हिंदू खुणा सापडल्याचा पुरातत्व खात्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला.


10:40 (IST)09 Nov 2019
निकाल वाचनास सुरूवात; शिया वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली

अयोध्या खटल्याच्या निकाल वाचणास सुरूवात झाली आहे. न्यायालयानं शिया वक्फ बोर्डानं फैजाबाद न्यायालयाच्या १९४६मध्ये देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे.


10:31 (IST)09 Nov 2019
अमित शाह यांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक

अयोध्या खटल्याच्या निकाल काही वेळात सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. शाह यांच्या निवास्थानी ही बैठक होत असून, बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, आयबीचे प्रमुख अरविंद कुमार आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

10:21 (IST)09 Nov 2019
आजचा निर्णय महत्वाचा; निकाल न्यायालयाचा, सरकारचा नाही : संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले,”आजचा निकाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. उद्धव ठाकरे यांनी अध्यादेश काढून राम मंदिर बांधण्याचं काम सुरू करावं अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत. तेच आम्ही करतोय. हा निकाल न्यायालयाचा असेल, सरकारचा नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च असून, तो मानला पाहिजे. अशीच भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे १९९१-९२ सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही.” अस राऊत म्हणाले.

09:45 (IST)09 Nov 2019
अयोध्येत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह उत्तर प्रदेशात कायदा सुवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचे उपाय योजन्यात आले आहेत. निमलष्करी दलाच्या ६० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव दलाचे १२०० पोलीस नेमण्यात आले आहेत. तर २५० पोलीस उपनिरीक्षक २० पोलीस उप अधीक्षक, दोन पोलीस अधीक्षक ३५ सीसीटीव्ही, १० ड्रोन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नेहमीप्रमाणेच भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहे. कोणत्याही प्रकारचं बंधन घालण्यात आलेले नसून, बाजारपेठही सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे, अशी माहितील उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशुतोष पांडेय यांनी दिली.

09:43 (IST)09 Nov 2019
अयोध्येत निमलष्करी दलाच्या ६० तुकड्या तैनात

निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह उत्तर प्रदेशात कायदा सुवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचे उपाय योजन्यात आले आहेत. निमलष्करी दलाच्या ६० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव दलाचे १२०० पोलीस नेमण्यात आले आहेत. तर २५० पोलीस उपनिरीक्षक २० पोलीस उप अधीक्षक, दोन पोलीस अधीक्षक ३५ सीसीटीव्ही, १० ड्रोन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नेहमीप्रमाणेच भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहे. कोणत्या प्रकारचे बंधन घालण्यात आलेले नसून, बाजारपेठही सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्या आहे, अशी माहितील उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशुतोष पांडेय यांनी दिली.

09:21 (IST)09 Nov 2019
न्यायालयाच्या निकालानंतर मोहन भागवत साधणार संवाद

अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीतील केशव कुंज परिसरात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाचे प्रतिनिधींचीही अशोक रोड येथे संवाद साधणार आहे.

08:54 (IST)09 Nov 2019
न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकारून शांतता राखा – नितीन गडकरी

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून आज निकाल दिला जाणार असून, केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून लोकांनी शांतता राखावी, असं गडकरी म्हणाले.

08:44 (IST)09 Nov 2019
१०६ वर्षे जुना हा वाद; आतापर्यंत काय घडलं?

अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद १०६ वर्षे जुना असून ब्रिटिशकाळापासून यावर सुनावण्या सुरू आहेत. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय या प्रवासादरम्यान या वादाने देशातील वातावरण ढवळून निघालं. अलहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या खटल्यावर आज निकाल येणार आहे.

08:14 (IST)09 Nov 2019
निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीशांकडून सुरक्षेचा आढावा

अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा  संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवार निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती.

08:03 (IST)09 Nov 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशवासियांना शांततेचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. अयोध्येच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जो काही निकाल येईल, तो कुणाचा विजय किंवा पराभव नसेल.  दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे यासाठी गेल्या आठवडय़ात बैठकाही झाल्या होत्या.

07:54 (IST)09 Nov 2019
सर्वोच्च न्यायालयात १४ आव्हान याचिका

अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निकाल २०१०मध्ये अलाहाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानुसार, रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात या जमिनीचे वाटप करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एकूण १४ आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ayodhya verdict live updates ramjanam bhoomi babri masjid case bmh