करोनाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, प्रत्येकजण लसीची वाट बघत आहे. भारतासह अनेक देशात सध्या करोनाच्या लसीच्या चाचण्या सुरू असतानाच एका आयुर्वेदीक डॉक्टरनं करोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा करणं डॉक्टराच्याच अंगलट आला. आपण शोधलेली औषधी देशभरात वापरण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची अजब मागणी करणाऱ्या या डॉक्टरची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं १०,००० दंड ठोठावला.

जगभरात दररोज लाखो लोकांना करोनाचा संसर्ग होत आहे. अनेकांचा मृत्यूही झाला असून, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे लसीच्या चाचण्याही युद्धपातळीवर सुरू आहेत. अशात हरयाणातील एका आयुर्वेदिक डॉक्टरनं करोनावर औषध सापडल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर ओमप्रकाश वेद ज्ञानतारा या बीएएमएस डॉक्टरनं थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

आणखी वाचा- करोनाबाधितांची संख्या २९ लाखांच्या पुढे; चोवीस तासात आढळले ६८,८९८ नवे रुग्ण

डॉक्टर ज्ञानतारा यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत जगभरात ८ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. त्याचबरोबर करोनावर आपण शोधलेलं औषध डॉक्टर व रुग्णालयांनी वापरायला हवं असं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

आणखी वाचा- भारताचा नवा उच्चांक, एका दिवसात नऊ लाखांहून अधिक करोना चाचण्या

सुनावणी वेळी डॉक्टर ज्ञानतारा यांनी आपण करोनावर शोधलेली औषधी वापरण्यासाठी केंद्र सरकारला न्यायालयानं आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. दरम्यान, सुनावणी अंती न्यायालयानं दाखल करण्यात आलेली जनहित याचिका चुकीची असल्याचं सांगत फेटाळून लावली. त्याचबरोबर अशा विचित्र याचिकासंदर्भात समाजात संदेश देण्यासाठी याचिकाकर्त्या डॉक्टरला १०,००० रुपये दंड ठोठावला. डॉक्टर ओमप्रकाश ज्ञानतारा यांचं शिक्षण बीएएमएस पर्यंत झालं आहे. सध्या ते आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून उपचार करतात.