परदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. याच्या मदतीने भारताबाहेर राहणारे लोक येथे येऊन पारंपारिक औषधांनी उपचार घेऊ शकतील. गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, आयुष हॉलमार्क लवकरच लॉन्च केला जाईल, जेणेकरून भारतात बनवलेल्या उत्कृष्ट दर्जाची आयुष उत्पादने सहज ओळखता येतील. शेतकऱ्यांना औषधी वनस्पती वाढवण्यासाठी आणि बाजारात विकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ई-मार्केटप्लेसच्या विस्ताराबाबतही पंतप्रधान मोदींनी भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतात पारंपारिक उपचार घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी लवकरच विशेष आयुष व्हिसा दिला जईल असं जाहीर केलं. “आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे,” असं मोदी म्हणाले.

“आयुषच्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या आणि नवे उपक्रम राबवण्याच्या शक्यता अमर्याद आहेत. आम्ही आधीच आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ पाहत आहोत. आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत. हा हॉलमार्क भारतात उत्पादन करण्यात आलेल्या उच्च दर्जाच्या आयुष उत्पादनांना लागू केला जाईल,” असंही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे गांधीनगरमध्ये आयुष गुंतवणूक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

“आयुषच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि नावीन्यतेची प्रचंड क्षमता आहे. आयुष औषधे, पूरक आणि सौंदर्यप्रसाधने यांच्या उत्पादनात अभूतपूर्व वाढ झाली आहे. यावर्षी १४ स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत. मला आशा आहे की लवकरच आयुष क्षेत्रातील कोणीतरी या श्रेणीपर्यंत पोहोचेल,” असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा खाजगी कंपनीचे मूल्य १ अब्ज डॉलर्स (सुमारे ७५ अब्ज रुपये) पर्यंत पोहोचते तेव्हा त्याला युनिकॉर्न म्हणतात.