Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana details in Marathi : ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू केली होती. देशातील सर्वसामान्य लोकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेला लवकरच सात वर्षे पूर्ण होणार आहेत.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते. हे कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. या योजनेअंतर्गत देशातील २९ हजारांहून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात. या योजनेत २०२४ मध्ये बदल करण्यात आला आणि ७० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आला.
आयुष्मान भारत योजनेत कोणत्या आजारांवर उपचार होतात? आयुष्मान भारत योजनेचा लाभ कसा घ्यायचा? योजनेची पात्रता, आयुष्मान कार्ड ऑनलाइन कसे काढायचे? या योजनेत आतापर्यंत काय बदल झाले? याबद्दल जाणून घेऊयात.
२०२४ मध्ये आयुष्मान भारत योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यानुसार, ७० वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येतो. यामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल, असं निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं.
आयुष्मान भारत योजना काय आहे? What is Ayushman Bharat Yojana (PMJAY)?
आयुष्मान भारत योजनेला ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, गरीब आणि गरजू कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते. गरीब कुटुंबांतील लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्याला या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते.
आयुष्मान भारत योजनेची वैशिष्ट्ये (Features of PMJAY Scheme)
वैशिष्ट्ये | तपशील |
योजनेचे नाव | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) |
योजना सुरू झाल्याची तारीख | २३ सप्टेंबर २०१८ |
कव्हरेज (प्रति कुटुंब) | ५ लाख रुपये/वर्ष |
हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या खर्चाचे कव्हर | ३ दिवस |
रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चाचे कव्हर | १५ दिवस |
हेल्पलाइन क्रमांक | १८००-१११-५६५ |
फॅमिली फ्लोटर योजना | एकाच पॉलिसी अंतर्गत संपूर्ण कुटुंबासाठी कव्हर प्रदान करते. |
कॅशलेस आरोग्यसेवा | लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट केलेल्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांचा लाभ घेता येईल. |
वाहतूक खर्चाची परतफेड | रुग्णालयात पोहोचण्यासाठी झालेल्या खर्चाचा समावेश आहे. |
डेकेअर खर्चाचा समावेश | रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसलेल्या उपचारांचा समावेश आहे. |
देशभरात आरोग्य सेवा केंद्रांची स्थापना | संपूर्ण भारतात प्राथमिक आरोग्यसेवेसाठी १.५ लाख केंद्रे स्थापन केली. |
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता (Ayushman Bharat Eligibility Criteria)
आयुष्मान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारे लोक, भूमिहीन लोक, ग्रामीण भागात राहणारे लोक, तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील लोक , अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक (EWS) तसेच कमी उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात आहेत. जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, मजुरी करून उदरनिर्वाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
कुटुंबाचे कार्ड काढायचे असेल तर तुम्ही कुटुंबाच्या सर्व सदस्यांचा उल्लेख असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UTI-ITSL केंद्रावर जा. तिथे पात्रता तपासा, तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून मिळेल.

आयुष्मान भारत योजनेसाठी कोण पात्र नाही? Who is Not Eligible for the Ayushman Bharat Yojana?
आयुष्मान भारत योजना सर्वांसाठी नाही. PMJAY मधून काही विशिष्ट लोक आणि कुटुंबांना वगळण्यात आले आहे. यामध्ये-
- ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
- ज्यांच्याकडे स्वतःचे घर आहे, ते या योजनेसाठी अपात्र ठरतात.
- ज्यांच्या घरातील सदस्य नोकरीवर आहेत, तसेच जे स्वतः सरकारी नोकरी करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
ऑनलाइन आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काय करावे? (How to Register for PMJAY Online?)
- ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.
- तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करू शकता किंवा सरकारी वेबसाइटला भेट देऊन कार्डसाठी अर्ज करू शकता.
- ॲप डाउनलोड केल्यावर मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा.
- पात्रता तपासा.
- आधार ई-केवायसी करा.
- फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कोणत्या आजारांवर उपचार होतात? (What is Covered Under PMJAY?)
या योजनेंतर्गत करोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात.
एका कुटुंबातील किती लोकांचे आयुष्मान कार्ड काढता येतात?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील किती लोकांचे कार्ड काढता येतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा नाही. जे या योजनेसाठी पात्र आहेत, ते आयुष्मान कार्ड काढू शकतात.
आयुष्मान योजनेचे फायदे Benefits of the Ayushman Bharat Yojana (PMJAY)
या योजनेत भारतातील सुमारे ४०% लोकसंख्येचा समावेश आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या अक्षम नागरिकांना आरोग्यसेवा प्रदान करते. या योजनेचे प्रमुख फायदे हे आहेत –
कॅशलेस उपचार:
योजनेअंतर्गत, रुग्णालयात दाखल झाल्यावर कोणतेही पैसे न भरता उपचार मिळतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात.
मोफत आरोग्य संरक्षण:
योजनेत कुटुंबांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते.
रुग्णालयात दाखल झाल्यावर उपचार:
गंभीर आजारांवर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची सोय आहे, ज्यात शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे.
आधी आणि नंतरचा खर्च:
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि उपचारानंतरही काही खर्च योजनेत समाविष्ट आहेत.
देशभरात कुठेही घेता येतात उपचार:
ही योजना देशभरात लागू असल्याने, कुठेही उपचार घेता येतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लाभ:
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत विशेष लाभ मिळतो.
कुटुंबांतील प्रत्येक सदस्याला लाभ:
कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो.
सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार:
या योजनेत सरकारी आणि खाजगी रुग्णालये दोन्ही समाविष्ट आहेत, ज्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी अधिक पर्याय मिळतात.
एकापेक्षा जास्त शस्त्रक्रिया कव्हर होतात:
एकापेक्षा जास्त शस्त्रक्रियांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते, त्यानंतरच्या प्रक्रिया कमी दराने कव्हर केल्या जातात (दुसऱ्या आणि तिसऱ्या शस्त्रक्रियांसाठी अनुक्रमे ५०% आणि २५%).
गंभीर आजारांसाठी विमा:
कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्य वाढवून मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड कसे काढायचे? How to Apply for an Ayushman Card for Senior Citizens?
७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी आयुष्मान कार्ड काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा सरकारी रुग्णालयात जावे लागेल.
तिथे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड, इत्यादी) सादर करावी लागतील.
तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि इतर आवश्यक तपशील द्यावे लागतील.
त्यानंतर, तुमचे नाव आणि माहिती आयुष्मान भारत योजनेच्या डेटाबेसमध्ये तपासली जाईल आणि तुमचे कार्ड तयार केले जाईल.
या योजनेत कोणते खर्च कव्हर होत नाहीत? What is Not Covered Under PMJAY?
आयुष्मान भारत योजनेत ओपीडी (आउट पेशंट डिपार्टमेंट) खर्च, रुग्णालयाबाहेरून खरेदी केलेली औषधे आणि कॉस्मेटिक सर्जरी यासारख्या काही गोष्टींचा समावेश नाही. तसेच, काही आजार, खासकरून दीर्घकालीन आजार ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही याचा समावेश होत नाही. एचआयव्ही/एड्स, कर्करोग (काही अपवाद वगळता), किंवा अवयव प्रत्यारोपण यासारख्या काही आजारांसाठी पीएमजेएवाय योजनेत मर्यादा असू शकतात.