छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एका मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर त्याच्या मृत्यूनंतर तब्बल ४२ दिवसांनी आयुष्मान भारत योजनेचा संदेश आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाने हा संदेश डेटा एंट्री ऑपरेटरकडून झालेल्या चुकीमुळे गेल्याचे स्पष्ट केले असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

मृत्यूनंतर आला ‘तुम्ही बरे झाला आहात’ असा संदेश

जशपूरमधील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या सीमा कुजूर यांना १० ऑगस्ट रोजी त्यांच्या पती देवनारायण राम यांच्या मोबाईलवर आयुष्मान योजनेशी संबंधित संदेश मिळाला. संदेशात, “देवनारायण राम, आपण बरे होऊन घरी परतत आहात याचा आम्हाला आनंद आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पुरवण्यात आलेल्या मोफत आरोग्य सेवांबाबत आपण समाधानी असाल, अशी आम्हाला आशा आहे,” असे लिहिले होते. मात्र देवनारायण यांचा ४२ दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हा संदेश पाहून त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला.

३० जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू

सीमा यांनी देवनारायण यांना २६ जून रोजी अंबिकापूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले होते. सुरगुजा जिल्ह्यातील या रुग्णालयात उपचार सुरू असताना ३० जून रोजी देवनारायण यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाने त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही जारी केले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मात्र त्यानंतर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीनंतर त्यांच्या मोबाईलवर रुग्ण बरा होऊन घरी परतत असल्याचा संदेश आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.

पत्नीने मागितली उच्चस्तरीय चौकशी

या प्रकाराबाबत सीमा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नाराजी व्यक्त केली. “असा संदेश पाहणे मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी किती त्रासदायक असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता. एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते, याचा मला प्रश्न पडला आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. सामान्य आदिवासी नागरिकांच्या बाबतीत काय होत असेल, याची कल्पना करता येते. मी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करते आणि अशा चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

क्लेम उशिरा बंद केल्याने चूक

रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. देवनारायण यांच्या आयुष्मान भारत योजनेतील उपचाराचा क्लेम पोर्टलवर वेळेत बंद न झाल्यामुळे ही चूक झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. रुग्णालयाच्या माहितीनुसार, देवनारायण यांच्या उपचाराचा क्लेम त्यांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी ६ ऑगस्ट रोजी पोर्टलवर अपडेट करण्यात आला. डेटा एंट्री ऑपरेटरकडून झालेल्या विलंबामुळे ही प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली. क्लेम बंद झाल्यानंतर प्रणालीकडून आपोआप संदेश पाठवण्यात आला आणि त्यात रुग्ण बरा होऊन घरी परतत असल्याचे नमूद झाले.

डेटा एंट्री ऑपरेटरवर कारवाई

रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये यासाठी राज्य नोडल एजन्सीला माहिती देण्यात आली आहे. मृत रुग्णांच्या नोंदी तपासल्यानंतरच अशा प्रकारचे संदेश पाठवले जावेत, यासाठी माहितीची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. देवनारायण यांच्या प्रकरणावर देखरेख ठेवणाऱ्या कलेक्टर रेटवर नियुक्त डेटा एंट्री ऑपरेटरला काढून टाकण्यात आले आहे.

आयुष्मान योजनेत १६,७०० रुपयांचे उपचार

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, देवनारायण यांच्या पाच दिवसांच्या उपचारादरम्यान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केवळ आयसीयू आणि रक्त संक्रमणाची १६,७०० रुपयांची पॅकेजेस वापरण्यात आली. त्यांच्या आयुष्मान कार्ड खात्यात अजून ४ लाख ७४ हजार ८०० रुपये शिल्लक असल्याचेही रुग्णालयाने सांगितले. उपचाराशी संबंधित प्रक्रियांसाठी बायोमेट्रिक आणि ओटीपी पडताळणी आवश्यक असल्याचे रुग्णालयाने सांगितले. रुग्णाच्या आयुष्मान कार्डद्वारे संबंधित नोंदींची पडताळणी करता येते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.