लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी बोलावलेल्या बैठकीस नुकतेच जामिनावर मुक्त झालेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान व अखिलेश यांचे काका शिवपालसिंह यादव रविवारी अनुपस्थित राहिले.

आझम खान यांचे प्रसिद्धीप्रमुख फसाहत अली खान यांनी, अखिलेश यादव यांनी आझम खान कारागृहात असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तसेच अखिलेश यांनी मुस्लीम समाजाचीही उपेक्षा केली, असाही आरोप त्यांनी केल्याने पक्षात फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

फसाहत अली म्हणाले, की आझम खान यांना अखिलेश कारागृहात भेटायला एकदाच गेले.  अडीच वर्षांपासून त्यांच्या मुक्ततेसाठी अखिलेश यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. रविदास मेहरोत्रा जेव्हा आझम खान यांना भेटण्यास कारागृहात गेले होते, तेव्हा खान यांनी त्यांची भेट घेतली नव्हती. मात्र, त्याच दिवशी त्यांनी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची भेट घेतली. तेव्हाच आझम खान नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती.