गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा मतदारसंघ असलेल्या आझमगडमध्ये एका सभेला संबोधित केले. रॅलीत सीएम योगींनी सपा प्रमुखांवर सातत्याने टीका केली. तसेच आझमगढचे नाव बदलण्याची मागणी केली. आधीच राज्यातील अनेक ठिकाणांच्या नामांतरामुळे टीकेला सामोरे जावे लागलेले मुख्यमंत्री योगी यांनी आझमगढ लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलून “आर्यमगड” करण्यात यावे, असे सुचवले. तर अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा दिला आहे.

समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र यांच्यावर योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.  “आझमगडने दोन माजी मुख्यमंत्री दिले असतील किंवा त्यांना लोकसभेत पाठवले असेल पण त्यांच्यामुळे आझमगडची ओळख नेहमीच खालावली आहे. २०१४ पूर्वी, आझमगढमधील एका व्यक्तीला देशात कुठेही हॉटेलची खोली मिळण्यातही समस्या येत होती. आझमगडचे नाव बदलून आर्यमगड करण्याची मागणी करण्यात आली आहे,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, “आझमगडमध्ये आम्हाला विधानसभेच्या पुरेशा जागा मिळत नाहीत, असे मी आधी सांगितले होते. पण आता पुरे झाले. मी तुम्हाला इथल्या विधानसभेच्या सर्व जागा भाजपाला देण्याचं आवाहन करत आहे, जेणेकरून योगी आदित्यनाथ यांना राज्याचे मुख्यमंत्री करता येईल.”

दरम्यान, २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरातील अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत, ज्यामुळे ते कायम विरोधकांच्या निशाण्यावर राहिले. अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज तर फैजाबादचे अयोध्या असे नामकरण करण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला, उन्नावमधील एका ग्रामपंचायतीने जिल्ह्यातील एका ब्लॉकचे नाव ‘मियांगंज’ वरून ‘मायागंज’ असे बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता.