गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांनी ३ जून रोजी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कर्नाटकच्या राजकारणात नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. कॅबिनेट मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर दोन दिवसांतच रेड्डी यांनी त्यांचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता.

या घडामोडीनंतर आता कर्नाटकच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक सरकारमधील मंत्री बी.नागेंद्र यांनी अचानक मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मंत्री बी.नागेंद्र यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता, त्यानंतर अखेर बी.नागेंद्र यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

बी.नागेंद्र ढसाढसा रडले; काय घडलं?

मंत्री बी.नागेंद्र यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता आणि त्यानंतर अखेर शुक्रवारी संध्याकाळी बी.नागेंद्र यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. मात्र, राजीनामा देण्याची घोषणा करताना बी.नागेंद्र हे ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले.

बी.नागेंद्र यांनी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करताना दावा केला की,’वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील व्यवहार प्रकरणामध्ये माझी स्वाक्षरी कुठे आहे? दलित असल्यामुळे मला लक्ष्य केलं जात आहे’, असा आरोप बी.नागेंद्र यांनी केला आहे.

कथित व्यवहारांमध्ये बँकांचा सहभाग असताना आपल्यालाच का जबाबदार धरलं जात आहे? मग केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार नाहीत का? कर्नाटकची जनता हे सर्व पाहत आहे. माझ्या विरोधात दररोज हजारो खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, असंही बी.नागेंद्र यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांनी कर्नाटक सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणात भाजपा आणि जेडीएसकडून बी.नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अखेर बी.नागेंद्र यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.