अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजच्या तरुणाईतील जेन-झी पीढिला (Gen Z) ‘जनरेशन गटार’ म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही कंगना यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “देशातील तरुणांना गटार म्हणणे हे बिघडलेल्या डोक्याचे लक्षण आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत रामदेव बाबा यांनी कंगना यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“तिचे तारुण्य कसे गेले? आणि जुने कारनामे कसे होते?” – रामदेव बाबांचा सवाल

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बाबा रामदेव यांना कंगना रणौत यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर संताप व्यक्त करत रामदेव बाबा म्हणाले, “तिचे बालपण कसे होते? तिचे तारुण्य कसे गेले? आणि तिचे जुने पराक्रम (कारनामे) कसे राहिले आहेत? मला अशा लोकांबद्दल जास्त बोलायचे नाही. पण देशातील तरुणाईला गटार म्हणणे हे साफ चुकीचे असून ते मानसिक बिघाडाचे लक्षण आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि तिच्या पक्षातील लोकांनी या वक्तव्याची त्वरित दखल घ्यायला हवी.”

मुलाखतीत पत्रकाराने ‘कंगना तुमची अनुयायी असून स्वतःला सनातनी मानते’ अशी आठवण करून दिली. यावर थेट उत्तर देताना रामदेव बाबा म्हणाले, “कोणी माझ्या योगाचे कौतुक करत असेल, म्हणून मी त्यांच्या चुका किंवा पापे झाकून ठेवू का?”

“तरुणाई हीच देशाची खरी ताकद”

तरुणाईचे समर्थन करताना बाबा रामदेव पुढे म्हणाले, “आजचा तरुण कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही. मग ते ब्राह्मण असोत, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी किंवा मागासवर्गीय – हे सर्व आपल्याच देशाची मुले आहेत. आजच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि ताकद आहे, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. तरुणांनी चांगल्या-वाईट अनेक गोष्टींना हादरवून सोडले आहे.”

कंगना रणौत नक्की काय म्हणाल्या होत्या?

कंगना रणौत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत ‘Gen Z’ म्हणजेच आजच्या तरुण पिढीवर ताशेरे ओढले होते. आपल्या पोस्टमध्ये कंगनाने लिहिले होते, “मी या पिढीला ‘जनरेशन गटार’ म्हणते. या तरुणांकडे समाजाला किंवा व्यवस्थेला देण्यासाठी काहीही नाही. हे तरुण अभ्यासात चांगले नाहीत आणि घर सांभाळण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. आई-वडिलांच्या पैशांवर जगणे, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि मोकाट आयुष्य जगण्यात हे तरुण धन्यता मानतात. स्वतःच्या पायावर उभे न राहता स्वातंत्र्याची भाषा करणे चुकीचे आहे. उत्तरदायित्वाशिवाय जगणारी ही पिढी गटारछाप आहे.”

वादानंतर कंगनाचे स्पष्टीकरण काय होतं?

आपल्या या वादग्रस्त वक्तव्यावर टीका झाल्यानंतर कंगना रणौत यांनी यावर स्पष्टीकरणही दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, “देशाच्या ७५ वर्षीय पंतप्रधानांवर टीका केली जाते, त्यांच्या दिवंगत आईबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. आम्हीसुद्धा विद्यार्थी चळवळींमध्ये भाग घेतला आहे, पण आजचे विद्यार्थी आंदोलनात ज्या प्रकारची अश्लील भाषा वापरतात, ते पाहून हे विद्यार्थी आहेत का असा प्रश्न पडतो. उद्या या तरुणांवर कायदेशीर कारवाई झाली, तर सर्वोच्च न्यायालयातील वकिलांचा खर्च त्यांचे आई-वडील करू शकतील का?”

कंगना रणौत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.