Baba Ramdev Issues Massive Protest Warning: “देशात चारही दिशांना गोंधळ माजला आहे. लहान शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांच्या शाळेत सुविधा नाहीत. शिक्षक नाही, पाणी-वीज-शौचालय अशा सुविधा उपलब्ध नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. काही ठिकाणी शिक्षक आहेत तर पुस्तके नाहीत. पुस्तके आहेत तर शिक्षक नाही. शिक्षक असतील तर परीक्षेत कॉपी होत आहे. पेपर फुटत आहेत”, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रसिद्ध योगगुरू बाबा रामदेव यांनी दिली आहे. “जर व्यवस्थेत लवकर सुधारणा झाली नाही तर मला पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल”, अशा इशाराही त्यांनी दिला.
बाबा रामदेव हे सातत्याने मोदी सरकारची बाजू उचलून धरताना यापूर्वी दिसून आले होते. मात्र आता त्यांच्या ताज्या विधानावर आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बाबा रामदेवही आता सरकारविरोधात बोलायला लागले असतील तर निश्चितच वातावरण बदलत आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
बाबा रामदेव यांच्या विधानाचा व्हायरल व्हिडीओ खाली पाहू शकता. “सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी प्रेमाने वागले पाहिजे. तरच लोकशाही टिकेल”, असेही ते म्हणाले. दुसऱ्या एका व्हिडीओत बाबा रामदेव यांनी एकाबाजूला जेन-झींचे कौतुक केले. तर पुढे तरूण मुला-मुलींचे अनेक प्रियकर-प्रेयसी असतात असेही अजब विधान केले. हाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हरिद्वारमधील पतंजली योगपीठावर राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना बाबा रामदेव यांना झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीवर बोट ठेवले. “देशभरात तरुणांची व्यापक आंदोलने होत आहेत आणि पुढेली होतील. या आंदोलनाचे रूपांतर अराजकतेत होता कामा नये”, असेही ते म्हणाले.
Baba Ramdev on Independence day
— Piyush Rai (@Benarasiyaa) August 15, 2026
– Chaos is spreading across the country.
– Children are complaining that there are no teachers in their schools.
– Basic facilities like electricity, water and toilets are missing.
– Cheating is rampant in some places, while question papers are… pic.twitter.com/hnDy3Npc8Y
पेपरफुटी, परीक्षेतील गोंधळावर टीका
बाबा रामदेव म्हणाले, “परीक्षेत गैरकारभार वाढला आहे. विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा प्रामाणिकपणे दिल्यानंतर त्यांचे हक्काचे गुण त्यांना मिळत नाहीत. प्रवेश परीक्षांच्या आधारावरच पुढे चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळतो. सरकारी नोकरी मिळवताना ९० ते ९९ टक्के घोटाळे होत आहेत. आपले कुटुंब, आपली संघटना, आपली विचारधारा आणि आपल्याच जातसमूहातील लोकांना नोकरी मिळवून दिली जाते आणि बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडले जाते. हे खूपच अपमानास्पद असून ही बाब लोकशाही आणि न्यायाच्या विरोधात आहे.”
‘नाहीतर मला आंदोलन करावे लागेल’
“परीक्षा पास होऊन जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीची वेळ येते तेव्हा उमेदवारांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना भरती केले जाते. यावर आंदोलन करावे लागले. त्यामुळे वेळ असतानाच सुधरा. नाहीतर देशात आणखी आंदोलने होऊ शकतात. आंदोलनाच्या नावावर अराजकता यायला नको, या मताचा मी आहे. पण देशात खूप घोटाळे होत आहेत. हे वेळीच सुधारा नाहीतर बाबा रामदेवला आंदोलन करावे लागेल”, असा इशाराही त्यांनी दिला.
Haridwar, Uttarakhand: Yoga guru Baba Ramdev says, "The ruling party should love the opposition like parents. This is democracy! And the opposition should recognize that the ruling party consists of elected leaders of the country and should not disrespect them. Both sides need to… pic.twitter.com/ZhsZIvLUwj
— IANS (@ians_india) August 15, 2026
‘सत्ताधाऱ्यांनी विरोधकांशी प्रेमाने वागावे’
“सर्वांनीच आपली भूमिका योग्यरितीने निभवावी. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पालकांप्रमाणे प्रेम करावे आणि सत्ताधाऱ्यांना जनतेने निवडून दिले आहे, हे समजून विरोधकांनी त्यांचा अनादर करू नये. ही खरी लोकशाही आहे. दोघांनाही हात पुढे करून एकमेकांना जवळ करावे लागेल. बाकी मेलोनी-पेलोनीला मी ओळखत नाही”, अशी प्रतिक्रिया बाबा रामदेव यांनी दिली.
तसेच उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर अभिषेक करण्याचा प्रयत्न झाला, यावरही त्यांनी टीका केली. हिंदूंमध्येही काही कुरापती लोक आहेत. मुसलमानांमध्येही असे लोक आहेत. या लोकांना कायद्याच्या चौकटीत अशी शिक्षा द्यावी की, पुन्हा कुणाचीही एकमेकांविरोधात द्वेष पसरविण्याची हिंमत झाली नाही पाहिजे, असे बाबा रामदेव म्हणाले.
Haridwar, Uttarakhand: Yoga guru Baba Ramdev says, "In every field, good things are happening. There are many children and youth, and some Gen Z are doing good things. Some people are also creating a ruckus and doing wrong things. Some boys and girls have five or ten girlfriends… pic.twitter.com/6QJS64EoJ2
— IANS (@ians_india) August 15, 2026
जेन-झींवर अजब विधान
जेन-झींबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, काही जेन-झीं मुले चांगले काम करत आहेत. तर काही ठिकाणी हुल्लडबाजही आहेत. एका मुला-मुलीचे पाच-पाच जोडीदार आहेत. काही लोक सिगारेट, मद्यही पितात. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की, चुकीच्या गोष्टी बाजूला करा आणि चांगल्या गोष्टींना घेऊन पुढे चला.
